शिक्षणवारी ज्ञान पंढरी

कोविड नियमांचे पालन करून तात्काळ शाळा सुरू करण्याची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी

आंबी (संदिप पाळंदे) : कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून शाळा सुरु कराव्यात, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी संदर्भातील बंद असलेली बी. डी.एस. प्रणाली तात्काळ सुरु करावी, इयत्ता सहावी ते आठवीला शिकवणाऱ्या सर्वच पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करावी, सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीत ०१ जानेवारी २००४ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या वेतननिश्चितीत होणारा अन्याय तात्काळ दूर करावा आदी प्रमुख मागण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेकडून श्रीरामपूर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन देण्यात आले.


मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात कोविड-१९ प्रादुर्भाव नियंत्रणात आलेला आहे. शासनाने १७ जुलै २०२१ रोजी शाळा सुरू करण्याबाबत परिपत्रक काढले आहे. परंतु टास्क फोर्सच्या निर्देशानुसार अद्यापही शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. संबंधित आदेशाला फक्त तोंडी स्थगिती आहे. शाळा बंद असल्याने व सगळीकडे ऑनलाईन शिक्षण शक्य नसल्यामुळे गेल्या दीड वर्षापासून विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत असल्याने शासनाने लेखी आदेश देऊन राज्यातील सर्व शाळा कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून सुरू करण्यात याव्यात. भविष्य निर्वाह निधीची प्रकरणे मागील चार महिने पासून बीडीएस प्रणाली बंद असल्यामुळे मंजुरीच्या प्रतीक्षेत होती. मात्र बीडीएस प्रणाली राज्य स्तरावरून बंद करण्यात आली आहे. ही बीडीएस प्रणाली परत सुरु करणे आवश्यक आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळांमधून इ. ६ वी ते ८ वी ला शिकवणाऱ्या पदवीधर विषय शिक्षकांना पदवीधर शिक्षकाची वेतनश्रेणी १००% पदांना लागू करावी. सातव्या वेतन आयोगातील वरिष्ठ वेतन श्रेणी संदर्भातील त्रुटी दूर करावी अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने अहमदनगर जिल्हा शिक्षक बँकेचे संचालक व माजी व्हा. चेअरमन नानासाहेब बडाख, तालुकाध्यक्ष सुजित बनकर, गुरुमाऊली मंडळाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोळे, उपाध्यक्ष अनिल गायकवाड, युवा परिषदेचे अध्यक्ष विनायक आढाव, तालुका सरचिटणिस गणेश पिंगळे, तालुका शिक्षक परिषदेचे उपाध्यक्ष शिवनाथ नारायणे, राजू बनसोडे
उपस्थित होते.

Related Articles

Back to top button