अहमदनगर

युवा ग्रामीण पत्रकार संघाकडून जलजीवन मिशन कामातील चुका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत केली कारवाईची मागणी

राहुरी : जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील चिंचोलीसह सर्वत्र रस्त्याच्या लगत टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या बदलून रस्त्यांपासून दूर टाकण्यात याव्यात अशी मागणी युवा ग्रामीण पत्रकार संघाने प्रशासनाकडे केली आहे. त्याबाबत गटविकास अधिकारी वैभव शिंदे यांना निवेदन देत तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात निवेदनात म्हटले आहे की, जलजीवन मिशन योजनेंतर्गत तालुक्यात सर्वत्र काम सुरू आहे. चिंचोली ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील काही भागात जलवाहिन्या भुमिगत करण्यात आल्या आहेत. मात्र, सदरच्या मुख्य अथवा इतर जलवाहिन्या प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्गाच्या अगदी लगत टाकण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने सध्या साठवण तलावाचे काम सुरू असलेल्या ठिकाणावरून चिंचोली फाट्याकडे येणारी मुख्य जलवाहिनी तांभेरे-चिंचोली या रस्त्याच्या अगदी लगत तर चिंचोली-देवळाली रस्त्याच्याही लगत इतर जलवाहीनी टाकण्यात आली आहे.

यासंदर्भात उप अभियंता यांना समक्ष भेटून या जलवाहिन्या दूर टाकण्यात याव्यात अथवा अशा टाकलेल्या जलवाहिन्यांचे बील अदा करण्यात येवू नये अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, संबंधित ठेकेदाराने घाईगडबडीत हे काम रेटून नेले आहे. चिंचोली-देवळाली रस्याचे काम लवकरच सुरू होत असून या रस्त्याचे रूंदीकरण प्रस्तावीत आहे. त्यामुळे या टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या रस्त्यात जाणार आहे. पर्यायाने भविष्यकाळात लिकेज अथवा काही अडचणी आल्यास ग्रामपंचायत रस्ता तोडून सदरच्या जलवाहीन्यांची डागडूजी करील का? असा प्रश्न यानिमित्ताने नागरिकांमधून विचारला जात आहे.

आगामी २५-३० वर्षाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून शासनाने करोडो रूपये या योजनेवर खर्च केल्याचे एकीकडे चित्र आहे तर दुसरीकडे ठेकेदार आपल्या मनमानी नुसार हे काम रेटून नेत असल्याचे प्रकार समोर येत आहे. तरी रस्त्यालगत टाकलेल्या या जलवाहिन्या रस्त्यापासून सुयोग्य अंतरावर टाकण्यात याव्यात. तसे आदेश संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना तत्काळ देण्यात यावेत व अशा मनमानी पध्दतीने काम करत असलेल्या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी अहमदनगर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर, तहसीलदार राहुरी यांना देण्यात आल्या आहेत. निवेदनावर जिल्हाध्यक्ष महेश भोसले, जिल्हा सचिव बाळकृष्ण भोसले, जिल्हा सहसचिव रमेश बोरूडे, निमंत्रक राजेंद्र म्हसे, तालुकाध्यक्ष अशोक मंडलिक, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव रमेश जाधव, रमेश खेमनर, मधुकर म्हसे, सोमनाथ वाघ, युनूस शेख, समीर शेख, नाना जोशी, प्रमोद डफळ, आदिंच्या सह्या आहेत.

सदर प्रकाराबाबत स्वतः प्रत्यक्ष कामाला भेटी देऊन व काळजीपूर्वक लक्ष घालून या जलवाहिन्या बदलण्याबाबत ठेकेदारांना सूचित करण्यात येईल. तसेच या योजनेत काही नियमबाह्य झाले असल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.

श्री जायभाय, उप अभियंता राहुरी 

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button