सगेसोयरे’च्या अधिसूचनेवर राहुरी तालुक्यातील सोनगाव सात्रळ पंचक्रोशीतून हरकतींचा पाऊस, 10 हजारांपेक्षा अधिक पत्र
राहुरी : कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोयऱ्यांनाही ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळवून देण्याबाबत राज्य सरकारने दि.26 जानेवारी 2024 रोजी अधिसूचना काढली. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाच्या आंदोलनाला या निर्णयामुळे मोठे यश प्राप्त झाले. आता या अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशनही बोलविण्यात आले आहे. मात्र सरकारच्या अधिसूचनेला ओबीसी प्रवर्गातून मोठ्या प्रमाणात हरकती दाखल होत आहेत.
राहुरी तालुक्यातील सोनगाव सात्रळ पंचक्रोशीतून हरकतींचा पाऊस पडत असून आज पर्यंत 10 हजार हकरती आल्या असून अजूनही ओघ सुरू आहे. या सर्व हरकती दाखल करण्यात येणार आहेत. वाडी वस्तीवर जाऊन सध्या हरकतींचे अर्ज संकलित करून गावनिहाय, वस्तीनिहाय वर्गीकरण करण्यात येत आहे. संपूर्ण नगर जिल्ह्यातून हरकतींचे पत्र येत असून परजिल्ह्यातूनही अनेकांनी तसे पत्र दिले आहे. सर्व हरकती पत्रे एकत्र करून ती मुंबईला सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागात जमा करण्यात येणार आहेत, अशी माहिती सोनगाव सात्रळ पंचक्रोशीतील किरण पाटील अंत्रे यांनी दिली.
हरकती नोंदणीसाठी पंचक्रोशीतील नरेंद्र अनाप, भाऊसाहेब अंत्रे, महेश पर्वत, गणेश अनाप, महेंद्र अनाप, विनोद अंत्रे, संतोष अंत्रे, संजय अनाप, बिपिन ताठे, रमेश पन्हाळे, अजित जोर्वेकर, अभिषेक ताजने, सोमनाथ जेजूरकर, संजय शिंदे, गणेश पठारे, अनिल पठारे, तुषार पठारे यांच्यासह अनेक ओबीसी बांधवांनी सहकार्य केले. या सर्वांचे किरण पाटील अंत्रे यांनी पंचक्रोशी नियोजन समितीच्या वतीने आभार मानले.