अहमदनगर

आर्थिक नियोजन असेल तरच जीवनात यशस्वी व्हाल- संतोष दळवी

शिक्षक भारतीच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन

राहुरी | जावेद शेख : आर्थिक नियोजन, कर्ज व्यवस्थापन, योग्य गुंतवणूक व्यक्तीच्या आयुष्यात असेल तरच जीवनात यशस्वी व्हाल असे प्रतिपादन मुंबई येथील प्रसिद्ध व्याख्याते सर्टिफाईड आर्थिक सल्लागार संतोष दळवी यांनी केले.

शिक्षक भारती संघटना अकोले यांनी शिक्षकांमध्ये आर्थिक साक्षरता व्हावी, या हेतूने अगस्ती विद्यालय अकोले येथे आर्थिक नियोजन चर्चासत्राचे आयोजन अहमदनगर जिल्हा संघटनेचे सरचिटणीस महेश पाडेकर, माध्यमिक विभागाचे तालुकाध्यक्ष संजय पवार, उच्च माध्यमिक विभागाचे तालुकाध्यक्ष संपत वाळके यांनी केले. मराठी माणूस पाठीमागे राहण्याचे कारण छोट्या छोट्या गोष्टी जाऊ दे या भूमिकेमुळे ते मागे राहतात. मेडिक्लेम, टर्म इन्शुरन्स नसल्यामुळे आयुष्याची जमापुंजी अडचणीच्या प्रसंगी दवाखान्यात गमावून बसतो. त्यामुळे जीवनात आर्थिक सल्लागार हा फार महत्त्वाचा आहे. योग्य मार्गदर्शन, नियोजन गरजेचे आहे. मराठी माणसांनी देखील टक्क्यांची भाषा शिकणे गरजेचे आहे. गुंतवणूक योग्य न झाल्यामुळे, कर्जाची बँक व्यवस्थित न निवडल्यामुळे मोठा तोटा व्यक्तीला होतो, अशा विविध विषयांवर दळवी यांनी मार्गदर्शन केले.

आतापर्यंत ६३० चर्चासत्रांमधून अनेक शासकीय कार्यालय, विद्यापीठांमध्ये सामाजिक आर्थिक साक्षरता केल्याबद्दल दळवी यांना यु.एस.ए. चा पुरस्कार देखील मिळाला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अगस्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी धुमाळ, अगस्ती पतसंस्थेचे चेअरमन जनार्दन हासे, प्राचार्य श्रीकांत आयरे, रामचंद्र गावडे, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, प्राथमिक मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष विलास सावंत, तलाठी सतीश गोंदके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पवार तर आभार ग्रामविकास अधिकारी संजय दुशिंग यांनी केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button