लोकशाही सक्षम होण्यासाठी मतदार नोंदणी आवश्यक – प्रांताधिकारी किरण सावंत
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : भारतीय लोकशाही सक्षम करण्यासाठी मतदार नोंदणी होणे गरजेचे आहे. मतदार नोंदणी केल्यानंतर प्रत्येक निवडणुकीत आपला मतदानाचा अधिकार आपण वापरला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात श्रीरामपूरचे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी केले.
मतदार नोंदणी अधिकारी श्रीरामपूर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ श्रीरामपूर, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना आणि सी.डी.जैन काॅलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा सी डी जैन काॅलेज ऑफ कॉमर्स यांच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सी डी जैन काॅलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ सुहास निंबाळकर होते. यावेळी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील बोलत होते.
पुढे बोलताना प्रांताधिकारी किरण सावंत पाटील म्हणाले की, कोणताही घटक दुर्लक्षित राहता कामा नये याकरिता अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर व आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र यांनी दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती करून दिव्यांग मतदार नोंदणीसाठी मोलाचे योगदान दिले. दिव्यांग व्यक्तींकरिता त्यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे.
यावेळी दिव्यांग मतदार जनजागृती अभियान राबवून दिव्यांग मतदार नोंदणीसाठी महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल श्रीरामपूरच्या आसान दिव्यांग संघटनेचे संस्थापक संजय साळवे व सचिव वर्षा गायकवाड यांना प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, सी डी जैन काॅलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ.सुहास निंबाळकर, ॲड. प्रसन्ना बिंगी यांच्या हस्ते निवडणूक मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पिंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. पाटील यांनी मानले.