कृषी

आदिवासी उपयोजनेंतर्गत शेळीपालकांसाठी निविष्ठा वाटप व प्रशिक्षण वर्ग संपन्न

राहुरी | जावेद शेख : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील अ.भा.स. संगमनेरी शेळी सुधार प्रकल्पाच्या आदिवासी उपयोजने अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा, ता.नवापूर येथील 250 आदिवासी शेळीपालकांना शाश्वत शेळीपालनासंबधी एकदिवसीय प्रशिक्षण वर्ग कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. आदिवासी शेळीपालकांना शाश्वत व व्यावसायिक शेळीपालनासंबधी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असावी व नवनवीन तंत्रज्ञानाबाबत सजगता निर्माण व्हावी ह्या हेतूने महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील व संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन नंदुरबार येथील डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास भाई पाटील यांचे हस्ते करण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यक्रमात संगमनेरी शेळी सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.विष्णू नरवडे यांनी शाश्वत शेळीपालनाचे महत्व, गोठा व्यवस्थापन, चारा व खाद्य व्यवस्थापन, शेळीच्या आहारात झाडपाल्याचे महत्व याबरोबरच एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन यासंबधी मार्गदर्शन केले. प्रा.राम शेंडे व प्रा.अमर लोखंडे यांनी गाभण शेळीचे व्यवस्थापन व करडांचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. नंदुरबार येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महेश गणापुरे यांनी शेळ्यांचे रोग व लसीकरणासंबंधी शेळीपालकांना अवगत केले.

यावेळी आदिवासी शेळीपालकांना मान्यवरांच्या हस्ते शेळ्या व इतर निविष्ठा यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदुरबार कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांनी केले. आभार कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख अन्वेषक जयंत उत्तरवार यांनी केले. पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. दिनकर कांबळे यांचे नेतृत्वाखाली प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. सदर प्रशिक्षण वर्ग यशस्वी करण्यासाठी योगेश पाडवी, संदीप कुवर, संदीप पवार, गौरव घोलप इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button