औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्पातर्फे हिंगवे व गोळाखाल येथे शेतकरी प्रशिक्षण संपन्न
राहुरी : येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी वनस्पतीशास्त्र विभागातील औषधी व सुगंधी प्रकल्प आणि सुपारी व मसाला विकास निर्देशालय कालीकत केरळ यांच्या संयुक्त विद्यमाने व राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी.पाटील, संशोधन संचालक डॉ.सुनील गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नाशिक येथील कळवण तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील हिंगवे व गोळाखाल या गावांमध्ये शेतकऱ्यांसाठी १२ व १३ जानेवारी रोजी एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात शेतकऱ्यांना औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवडीबद्दल तसेच मानवी जीवनात विविध आजारांवर वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींचे उपयोग व महत्व याबद्दलची माहिती डॉ. विजू अमोलिक व डॉ.विक्रम जांभळे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली. तसेच डॉ.दिलीप ठाकरे यांनी बीजोत्पादन व पिक लागवडीनंतर योग्य खते व औषधांची निवड याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुरी कृषी विद्यापीठाच्या कृषी वनस्पतीशास्र विभागाचे प्रमुख डॉ.विजू अमोलिक हे होते तर या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत औषधी व सुंगधी वनस्पती प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ.विक्रम जांभळे, बियाणे विभागाचे सहाय्यक प्रा. डॉ.दिलीप ठाकरे, गोळाखाल गावचे सरपंच प्रभाकर गायकवाड, चंद्रकांत बागुल, उत्तम बहिरम, भाऊराव महाले, व हिंगवे येथील कार्यक्रमात सरपंच निलेश बागुल, मा.पंचायत समिती सभापती रमेश आहेर, ग्रामपंचायत सदस्य दत्तू ठाकरे, ग्रामसेवक ऐ.आर.शेख हे होते.
यावेळी हिंगवे व गोळाखाल गावातील महिला व पुरुष शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती. यावेळी कार्यक्रमास उपस्थित शेतकऱ्यांना औषधी सुगंधी वनस्पती प्रकल्पातर्फे स्नेह भोजन व किटचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशाल निमसे, रमेश खेमनर, रावजी पटारे यांचे सहकार्य लाभले.