कृषी

भ्रुण प्रत्यारोपण तंत्रज्ञानातून संकरित गायीपोटी सहिवाल कालवडीचा जन्म

राहुरी : येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत राबविण्यात आलेल्या भ्रुण प्रत्यारोपण तंत्रज्ञानातून पहिल्यांदाच राहुरी परिसरातील खडांबे येथील संदीप कल्हापुरे यांच्या गोठ्यात संकरित गायीपोटी उच्च वंशावळीच्या सहिवाल कालवडीचा जन्म झाला आहे.

या सहिवाल जातीच्या कालवडीचे जन्मत: वजन 27 किलो असून पिता SA-29 व दाता गायी S-9422 असून प्रतिवेत दुध उत्पादन क्षमता 4500 लिटर आहे. महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक सहाय्याने विद्यापीठात देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. या प्रकल्पाअंतर्गत देशी गायींच्या संवर्धनासोबत भ्रुण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा अवलंब करून जातिवंत पैदाशीवर भर दिला जात आहे. आयव्हीएफ तंत्रज्ञानातून तयार केलेले उच्च वंशावळीचे भ्रुण ऋतूचक्र नियमन केलेल्या सरोगेट गायीच्या गर्भाशयात प्रत्यारोपित करण्यात येते. सुमारे 273 दिवसानंतर त्यापासून अधिक दुध क्षमतेच्या कालवडी उपलब्ध होतात अशी माहिती आयव्हीएफ/भ्रुण प्रत्यारोपण कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.विष्णू नरवडे यांनी दिली.

कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले की देशी गोवंशाचे जतन व संवर्धन जलद गतीने करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून शेतक-यांच्या गोठ्यात देशी गोवंशाचा पैदास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. राहुरी परिसरात आत्तापर्यंत 6 गिर व 1 सहिवाल कालवडीचा जन्म झालेला आहे. शुद्ध भारतीय जातीच्या उच्च वंशावळीच्या गायींचे जतन व संवर्धन करण्यासाठी भ्रुण प्रत्यारोपण तंत्रज्ञान प्रयोगशाळेतून प्रत्यक्ष शेतकर्याच्या दारात पोहोचविणे व त्याचा प्रसार होणे दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. दिनकर कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली सन 2021 पासून देशी गोवंशाचे जतन व संवर्धनाचा कार्यक्रम भ्रुण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाद्वारे शेतकर्यांच्या प्रत्यक्ष गोठ्यात राबविण्यात येत आहे. आजपर्यंत राहुरी, पुणे, सासवड, फलटण, बारामती, इंदापूर परिसरात 50 उच्च वंशावळीच्या देशी कालवडी जन्मलेल्या आहेत अशी माहिती देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने व डॉ. धीरज कंखरे यांनी दिली आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button