कृषी

पीक विविधीकरणाचा पथदर्शी प्रकल्प शेतकर्यांना दिशा देणारा ठरेल- डॉ. गोरंटीवार

राहुरी विद्यापीठ : दिवसेंदिवस हवामानातील बदलांचा दुष्परिणाम शेतीवर व मानवी आरोग्यावर होत आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठात बदलत्या हवामानावर लक्ष केंद्रित करुन विविध पीक पध्दतींवर संशोधन सुरु आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील आठ जिल्ह्यांत राबविल्या जाणार्या पीक विविधीकरणाचा पथदर्शी प्रकल्पात विविध पिकांची प्रात्यक्षिके घेतली जाणार असून यामधील निष्कर्ष शेतकर्यांसाठी फायद्याची ठरतील. यामुळे हा प्रकल्प राज्यातील शेतकर्यांना दिशा देणारा ठरेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वीत एकात्मिक शेती पध्दती संशोधन प्रकल्प तसेच भा.कृ.अ.प. भारतीय शेती प्रणाली संस्था, मोदिपूरम, उत्तर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने व कृषि आणि शेतकरी कल्याण विभाग, भारत सरकार यांच्या आर्थिक सहकार्याने महात्मा फुले कृषि विद्यापीठात कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीक विविधीकरणाचा पथदर्शी प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन राहुरी तालुक्यातील मानोरी येथे दीपस्तंभ ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कं.लि., खिळेवस्ती येथे करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. सुनिल गोरंटीवार बोलत होते.

यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, कृषि विद्या विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड, कृषि शक्ती व यंत्रे विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे, भाजीपाला प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. भारत पाटील, प्रकात्मिक शेती पध्दती प्रकल्पाचे प्रमुख डॉ. उल्हास सुर्वे, दीपस्तंभ ॲग्रो फार्मस प्रोड्युसर कं.लि.,चे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय वने, एकात्मिक शेती पध्दती प्रकल्पाचे प्रमुख डॉ. उल्हास सुर्वे, शास्त्रज्ञ डॉ. आदिनाथ ताकटे, डॉ. नितील उगले, कडधान्य सुधार प्रकल्पातील किटकशास्त्रज्ञ डॉ. चांगदेव वायाळ, डॉ. संजय सपकाळ, दीपस्तंभ ॲग्रो फार्मस प्रोड्युसर कं.लि.,चे संचालक शिवाजी जाधव, मोहन गुंड उपस्थित होते.

डॉ. सुनिल गोरंटीवार आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानावर मोठे संशोधन झाले असून या डिजीटल तंत्रज्ञानातील वापरामुळे शेतकर्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल होणार आहे. डॉ. दत्तात्रय वने यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जाणार्या विविध प्रकल्पांना विद्यापीठ स्तरावरुन मार्गदर्शनासाठी सहकार्य करु अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलतांना दिली.

डॉ. सी.एस. पाटील आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की महात्मा फुले कृषि विद्यापीठ शेतकर्यांना केंद्रस्थानी ठेवून संशोधन करीत आहे. या नाविन्यपूर्ण संशोधनाचा वापर शेतकर्यांनी आपल्या शेतीत करणे गरजेचे आहे. प्रत्येक शेतकर्याने मधमाशांना आवश्यक असणार्या पिकांची तसेच विविध वनस्पतींची लागवड करावी जेणेकरुन त्यांच्या अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ होईल. अतिरेकी किडनाशकांचा वापर टाळा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आनंद सोळंके यांनी केले.

एकात्मिक शेती पद्धती प्रकल्पाचे प्रमुख डॉ. उल्हास सुर्वे प्रकल्पाबद्दल माहिती देतांना म्हणाले की, मानोरी या गावात दीपस्तंभ ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय वने यांच्या सहकार्याने हरभरा पिकाच्या फुले विक्रम या वाणाची 195 एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. तसेच वांबोरी येथे 55 एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिके घेतली आहेत.

यावेळी झालेल्या तांत्रिक मार्गदर्शनात डॉ. विक्रम कड यांनी हरभरा काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि मुल्यवर्धन, डॉ. भारत पाटील यांनी कांदा पीक व्यवस्थापन, डॉ. चांगदेव वायाळ यांनी हरभरा किड व्यवस्थापन व डॉ. दत्तात्रय वने यांनी हरभरा शेतीतील अनुभव या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत ड्रोनद्वारे औषध फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी डॉ. सचिन नलावडे यांनी उपस्थितांना ड्रोनसंबंधीची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार डॉ. आदिनाथ ताकटे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी दीपस्तंभ ॲग्रो फार्मस प्रोड्युसर कपनीचे संग्राम धुमाळ, आप्पासाहेब हापसे, भाऊसाहेब खिलारी तसेच इतर सदस्य शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button