कृषी

नंदूरबार जिल्ह्यातील कृषि अधिकार्यांसाठी प्रशिक्षण वर्ग संपन्न

राहुरी विद्यापीठ : भारतीय किसान मंत्रालय व भारतीय कृषि प्रणाली संस्था, मोदीपूरम यांनी मंजूर केलेल्या पीक विविधीकरण या पथदर्शी प्रकल्पाद्वारे नंदूरबार जिल्ह्यातील कृषि अधिकार्यांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजीत करण्यात आला होता.

सदर प्रकल्प राबविण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, नियंत्रक सदाशीव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

पीक विविधीकरण या पथदर्शी प्रकल्पांतर्गत महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणार्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्ह्यात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामध्ये पुढील पाच वर्षांमध्ये या प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी शेतकर्यांसाठी व कृषि अधिकार्यांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच पुढील पाच वर्षात टप्याटप्याने या प्रत्येक जिल्ह्यात 250 एकरक्षेत्रावर पीक विविधीकरण प्रात्यक्षिके घेतली जाणार आहेत.

यात मुख्यत्वे कडधान्य, तेलबिया, मिलेट या पिकांचा समावेश असणार आहे. नंदूरबार जिल्ह्यातील अधिकारी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कृषि विद्या विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन आत्माचे प्रकल्प संचालक तथा नंदूरबारचे जिल्हा कृषि अधिकारी सि.के ठाकरे, कार्यक्रम आयोजक तथा एकात्मिक शेती प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. उल्हास सुर्वे, नंदूरबार येथील कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. राजेद्र दहातोंडे, उमेश पाटील उपस्थित होते.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. उल्हास सुर्वे यांनी पीक विविधीकरण प्रकल्पाची पार्श्वभूमी व एकात्मिक शेती, सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. श्रीधर देसले यांनी भाजीपाला लागवड, डॉ. आदिनाथ ताकटे यांनी जमीन आरोग्य, उमेश पाटील यांनी गहू व हरभरा लागवड यावर सविस्तर मार्गदर्शन केले. राजेश भावसार यांनी प्रक्षेत्र भेटी दरम्यान मार्गदर्शन केले. प्रशिक्षणासाठी नंदूरबार जिल्ह्यातील विभागिय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व सर्व मंडळ कृषि अधिकारी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button