गुरुवर्य ह.भ.प मनोहर महाराज भोर यांचा आज पेमगिरीत अभिष्टचिंतन सोहळा
बाळासाहेब भोर | संगमनेर : तालुक्यातील ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा लाभलेल्या मौजे पेमगिरीतील दत्त मंदिरात आज गुरुवर्य मनोहर महाराज भोर यांचा अभिष्टचिंतन सोहळा सायं. 6 वा. संपन्न होणार आहे. ह.भ.प. हौशीराम महाराज कोल्हे हे आजच्या कीर्तन सेवेतून वारकरी संप्रदयातील महामेरू गुरुवर्य मनोहर महाराज भोर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणार आहेत.
वारकरी संप्रदायाला नेहमीच आधार मानून शास्राची चौकट न ओलांडता आजपर्यंत कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातुन बाबांनी ही सेवा आजपर्यंत अविरत सुरु ठेवली आहे. साधं राहणीमान व उच्च विचारधारा हे तत्व बाबांनी निरंतर जपलं आहे. कधीही कोठे मोठेपणाचा आव नाही व वैयक्तिक कसलाही आग्रह बाबांनी कधी धरला नाही.
पेमगिरीतील सर्वच अखंड हरीनाम सप्ताह बाबांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहेत यातच खरी बाबांच्या कर्तृत्वाची उंची ठळकपणे दिसून येते. त्यातीलच पेमगिरीतील दत्त मंदिरातील सप्ताहात बाबांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे. “इवलेसे रोप लावीयेले द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरी” या उक्तीप्रमाणे बाबांनी संगमनेर व अकोले तालुक्यात वारकरी संप्रदायचं रोपटं लावलं व त्याचा विस्तार हा आज आकाशाला गवसणी घालणारा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
स्वराज्यसंकल्पभूमी पेमगिरीत वारकरी संप्रदायची पताका आजपर्यंत सतत तेवत ठेवणाऱ्या या महात्म्याचा आज समस्त ग्रामस्थ व नाशिक पदवीधर विधानपरिषदेचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेरच्या नागराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाबांचा सपत्नीक सन्मान केला जाणार आहे. शाल, श्रीफळ, पोशाख, पगडी, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असं या सन्मानाचे स्वरूप आहे. पेमगिरी व पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे अशी विनंती गुरुदत्त सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.