कृषी

औषधी व सुगंधी वनस्पतींच्या संवर्धनाबरोबरच संशोधन व त्याचा प्रसार करण्याची गरज – विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील

राहुरी विद्यापीठ : भारतामध्ये औषधी व सुगंधी वनस्पतीचे महत्त्व पूर्वापार आहे. प्राचीन ग्रंथात औषधी वनस्पतींचा उल्लेख जागोजागी आढळतो. पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या आजारांवर या औषधी वनस्पतींपासून तयार केलेल्या औषधांचा वापर होत होता. सध्या आधुनिक काळात जीवनशैली बदलल्यामुळे आपण वेगवेगळ्या आजारांना तोंड देत आहोत. याला पर्याय म्हणजे सध्या भारतात उपलब्ध असलेल्या विविध जैविक वनस्पतींचे त्याचबरोबर औषधी व सुगंधी वनस्पतींचे संवर्धन करणे, त्यामध्ये अधिकाधिक संशोधन करून त्याचा प्रसार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प, कालीकत (केरळ) येथील सुपारी व मसाला विकास निदेशालय यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय जिल्हास्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन डॉ. सी. एस. पाटील बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव येथील अम्मा असोसिएशनच्या अश्वमेध ग्रुपचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर वाकचौरे, अहमदनगर येथील अमृत आयुर्वेद हॉस्पिटलचे संचालक डॉ. मंदार भनगे, शेवगाव येथील आयुर्वेदिक कॉलेजच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. सगुना ठाकरे उपस्थित होते. याप्रसंगी कुलसचिव विजय पाटील, कृषि वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलिक, औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. विक्रम जांभळे उपस्थित होते.

यावेळी डॉ. सी. एस. पाटील आपल्या मार्गदर्शनामध्ये पुढे म्हणाले की औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठी, प्रसारासाठी व लागवडीचे क्षेत्र वाढण्यासाठी प्रामुख्याने शेतकऱ्यांकडून प्रयत्न व्हायला हवेत. शेतकऱ्यांनी मधमाशीचे महत्व लक्षात घेऊन या औषधी वनस्पतींच्या लागवडीबरोबरच आपल्या शेती उत्पादनाच्या वाढीसाठी मधमाशांच्या पेट्या आपल्या शेतामध्ये ठेवाव्यात. यामुळे त्यांना अधिकचे उत्पन्न मिळू शकेल. शेतकऱ्यांनी रासायनिक कीडनाशकांचा वापर कमी करून जैविक कीडनाशकांचा वापर वाढवण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी डॉ. ज्ञानेश्वर वाकचौरे, डॉ. मंदार भनगे व डॉ. सगुना ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पिंपळगाव उज्जैन येथील शेतकरी नाना वाघ व विद्यापीठातील सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक डॉ.चंद्रकांत साळुंखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या दोन दिवसीय चर्चासत्रात सहभागी शेतकर्यांना औषधी वनस्पतीसंदर्भात विविध विषयांवर या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. विजू अमोलिक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विक्रम जांभळे यांनी तर आभार डॉ. विलास आवारी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शेतकरी- शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष व उद्योजक वैभव काळे, पानवेल संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संजय गावडे तसेच या चर्चासत्रासाठी अकोले तालुक्यातील आदिवासी महिला शेतकरी, शेतकरी तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button