सांडपाणी व्यवस्थापनात कोंढवड ग्रामपंचायत अपयशी; ग्रामस्थांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
राहुरी : तालुक्यातील कोंढवड ग्रामपंचायतीने सहा महिन्यांपूर्वी गावातील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी बंदिस्त गटार बनवून चांगल्या कामाची सुरुवात केली. मात्र सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरले असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
माझ्या शेताच्या कडेला बंदिस्त गटारीचे पाणी सोडण्यात आल्याने मी ग्रामपंचायत कार्यालयात वेळोवेळी या दुषित पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी तोंडी विनंती केली होती. परंतु याचा त्रास वाढल्याने लेखी तक्रार अर्ज दिला आहे. आता तरी या कामाची पुर्तता करावी.
दत्तात्रय रामभाऊ म्हसे, ग्रामस्थ कोंढवड.
सविस्तर वृत्त असे की, कोंढवड ग्रामपंचायतीने सहा महिन्यांपूर्वी १५ वित्त आयोगातून गावातील काही भागात सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी बंदिस्त गटार बनविल्या होत्या. परंतु सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी कुठलीही सोय याठिकाणी आढळून आलेली नाही. या बंदिस्त गटारीचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधाच्या कडेच्या रस्त्यालगत तसेच या सांडपाण्यावर कुठलीही प्रक्रिया न करता हे सांडपाणी मुळा नदीच्या पात्रात सोडले आहे. यामुळे शेतकऱ्यांबरोबर या रस्त्याने प्रवास करणाऱ्या शाळकरी मुले, प्रवाशांचे व ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
त्रस्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात लेखी तक्रार अर्ज केल्यानंतर स्वतः सरपंचांनी गावातील व्हाट्सअप ग्रुपवर गटारीतील किड्यांमुळे सरपंचांसह गावाला डेंग्यू झाल्याचा संदेश पाठवल्याने ग्रामस्थांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे ग्रामपंचायत व पर्यावरण विभाग सांडपाण्याचे चुकीचे व्यवस्थापन करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करणार का ?
मधुकर म्हसे, प्रदेश संपर्क प्रमुख क्रांतीसेना.
रस्त्यालगत उघड्यावर सोडण्यात आलेल्या पाण्याच्या दुर्गंधी व वाढलेल्या डासांमुळे या ठिकाणी काम करणारे शेतकरी आजारी पडत असल्याने येथील दत्तात्रय म्हसे, अनिल म्हसे व शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात वेळोवेळी तोंडी विनंती करून थकल्यानंतर लेखी तक्रार केली आहे. यामुळे प्रक्रिया न केलेले सांडपाणी रस्त्याच्या कडेला तसेच मुळा नदी पात्रात सोडल्याने पर्यावरण विभागाने काय भूमिका घेणार याकडे कोंढवड ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
या बंदिस्त गटारीच्या कामासाठी लागणारे कागदपत्रांची पुर्तता करुन पुढील दीड- दोन महिन्यात या सांडपाण्याची व्यवस्था करण्यात येईल.
शिवाजी पल्हारे, ग्रामसेवक कोंढवड.