मराठवाडा

जायकवाडी धरणात पाणी सोडा, अन्यथा परिणामाला सामोरे जा

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित रास्ता रोको आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांचा इशारा

छत्रपती संभाजीनगर – मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय आयोजित रास्ता रोको आंदोलनात ‘जायकवाडी धरणात पाणी सोडा, अन्यथा परिणामाला सामोरे’ असा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिला आहे.

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी संभाजीनगर – जालना रोडवर गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालयासमोर तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहतूक कोंडी वाढल्याने सर्व आंदोलकांना पोलिसांनी एकतर्फा रस्ता सुरू करण्यास सांगितले. मात्र अदोलकांनी याला विरोध केल्यानंतर आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेतले. यावेळी अंदोलक आणि पोलिसांत बराच वेळ गोंधळ झाला. आताच पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करावी, नाहीतर आम्ही या ठिकाणावरून हलणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली असता जवळपास 35 ते 40 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी सूचना देवून तीन तासानंतर आंदोलकांना सोडून दिले. या रास्ता रोकोमुळे जालना रोडवर दुतर्फा गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामूळे मोठ्या प्रमाणवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

दरम्यान या अंदोलनात आजी माजी आमदारांचा सहभाग होता. यात माजी राज्यमंत्री अनिल पटेल, आ. राजेश टोपे, सुरेश वरपूडकर, आ.संजय सिरसाठ, आ.राहुल पाटील, डॉ.कल्याण काळे, नामदेव पवार, उत्तमसिंग पवार, अर्जुन खोतकर, कैलास गोरंटियाल, नंदकुमार घोडेले, अमरसिंह पंडित, बदामराव पंडित, नितीन देशमुख, सतिश घडागे, संजय वाघचौरे, राजेंद्र जंजाळ, दत्ताभाऊ गोर्डे, संतोष तांबे, डॉ. गुलदाद पठाण, सुनील शिंदे, माऊली मुळे, संदीप काळे, संतोष माने, गणेश औटे यांच्यासह शेकडो आंदोलक सहभागी झाले होते.

जायकवाडी धरणात हक्काचे साडे आठ टीएमसी पाणी सोडण्यासाठी नगर आणि नाशिक जिल्ह्यातील नेत्यांनी घेतलेल्या चुकीच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सर्व पक्षीय नेत्यांनी तब्बल तीन तास छत्रपती संभाजीनगर येथे जालना रोडवरील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालयासमोर रास्ता रोको करत आक्रमक आंदोलन केले. मराठवाड्याचा पाणीप्रश्न चिघळण्याची चिन्हे असून या प्रश्नासाठी व्यापक जन आंदोलन उभे करत हक्काचे पाणी मिळवू असा विश्वास, आंदोलक नेते माजी मंत्री अनिल पटेल, राजेशभैय्या टोपे यांनी व्यक्त केला. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते आणि विविध संघटनांचा सक्रिय सहभाग होता. 

प्रतिवर्षी ऑक्टोबर महिन्यात पाण्याचे समन्यायी वाटप करण्यात यावे असा कायदा असताना नगर आणि नाशिकचा आडमुठेपणा हा मराठवाड्यावर अन्याय करणारा आहे. जायकवाडी प्रकल्पावर छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, जालना या जिल्ह्यांसह नेवासा, शेवगाव, पाथर्डी आदी नगर जिल्ह्यातील तालुकेही या पाण्याचा पिण्यासाठी, सिंचनासाठी, उद्योगासाठी लाभ घेत असताना नगर जिल्ह्यातील नेते केवळ राजकारणासाठी पाणी प्रश्न गंभीर बनवत आहेत. प्रादेशिक वाद निर्माण करत असल्याचा आरोप अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाचे सरचिटणीस भाई नितीन देशमुख यांनी केला आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button