गांधी जयंतीदिनी पवार यांच्यासह शेतकऱ्यांचे निळवंडेप्रश्नी आमरण उपोषण
देवळाली प्रवरा | राजेंद्र उंडे सर : निळवंडेचे काम पूर्ण करून सिंचन क्षमता निर्मिती करण्यात येत आहे, असे लेखी आश्वासन देण्यात आले होते. परंतु आजतागायत कोणतीच कारवाई झालेली नाही. यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. त्यामुळे या दोषी असणाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली गेली आहे. लोकप्रतिनिधीच्या दुटप्पी भूमिकेमुळे निळवंडे डाव्या कालव्याची चाचणी घेण्यात आली व निळवंडेच्या उजव्या कालव्याची कामे जाणीवपूर्वक रखडवली आहेत. यामागील राजकारण शेतकरी जाणत आहेत ते या दुराग्रही वागणुकीबाबत अनभिज्ञ नाहीत. सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते यांनी निळवंडे साठी विविध प्रकारची आंदोलने, उपोषणे तसेच रास्ता रोको केलेली आहेत, त्या सर्वांचा एकच ध्यास होता, तो म्हणजे निळवंडेचे पाणी शेतात येईल व बळीराजा सुखावेल, अशी आशा करणे हि धिसुर झाली असल्याने 2 ऑक्टोबर 2023 रोजी सोमवारी गांधी जयंतीच्या दिवशी तांभेरे ता.राहुरी येथे श्रीराम मंदिर समोर 182 गावातील निळवंडे लाभधारक शेतकरी यांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी दिली आहे.
2 ऑक्टोबर 2023 रोजी सोमवारी गांधी जयंतीच्या दिवशी तांभेरे येथे श्रीराम मंदिर समोर निळवंडेच्या लाभधारक शेतकरी यांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणात लाभ क्षेत्रातील 182 गावातील शेतकरी सहभागी होणार आहे. उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची प्रमुख मागण्यांमध्ये निळवंडे उजवा व डाव्या कालव्याची कामे तात्काळ पूर्ण करून लाभधारक शेतकऱ्यांना शेतात पाणी द्यावे, प्रस्तावित कालव्यांच्या मध्ये येणाऱ्या अडचणी (वनविभाग) व इतर विभागांच्या मंजुरी शासनाने आपल्या स्तरावर सोडविणे, डाव्या आणि उजव्या कालव्यावरील आच्छादित कालवे ओपन स्वरूपाचेच व्हावेत, 24 फेब्रुवारी 2022 रोजी दिलेला कार्यारंभ आदेश रद्द करण्यात यावा, बंद पाईप कालवे रद्द करण्यात यावे, निळवंडे धरणावर 182 गावांचे पिण्याचे पाणी आरक्षण करावे, चारी व पोट चारी याही ओपन पद्धतीनेच करण्यात याव्या, 17 जानेवारी 2020 कार्यकारी अभियंता यांच्या पत्रान्वये कालव्यांची कामे सन 2022 – 23 पर्यंत पूर्ण करून सिंचन क्षमता निर्मिती करण्यात येत आहे, असे लेखी आश्वासन देण्यात आले होते. परंतु आजतागायत कोणतीच कारवाई झालेली नाही. यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. त्यामुळे या दोषी असणाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून चातकाप्रमाणे वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली गेली आहे. लोकप्रतिनिधीच्या दुटप्पी भूमिकेमुळे निळवंडे डाव्या कालव्याची चाचणी घेण्यात आली व निळवंडेच्या उजव्या कालव्याची कामे जाणीवपूर्वक रखडवली आहेत. यामागील राजकारण शेतकरी जाणत आहेत. ते या दुराग्रही वागणुकीबाबत अनभिज्ञ नाहीत, असे पवार यांनी सांगितले.
पवार पुढे म्हणाले की, वेळोवेळी अनेक वर्षांपासून अनेक सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी निळवंडेसाठी विविध प्रकारची आंदोलने, उपोषणे व रास्ता रोको केलेला आहे. त्या सर्वांचा एकच ध्यास होता. तो म्हणजे निळवंडेचे पाणी शेतात येईल व बळीराजा सुखावेल. परंतु नियतीचा खेळ वेगळाच खेळ खेळत होती. मागील काही वर्षात निधीची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होती. कामे जोशाने सुरू झाली होती. परंतु मधील कालावधीत राज्य सरकार बदलले आणी निळवंडे कालव्यांच्या कामाला ग्रहण लागले. नवीन मंत्री आले आणि कालव्यांच्या कामाची गती मंदावली. यामध्ये कालव्यांची कामे रखडवण्यासाठीच नवीन नियम लागू केले. त्यात कालव्यांच्या कामासाठी लागणारी गौण खनिजे, वाळू, खडी साहित्यसामग्री बंद झाली.
याचा फायदा राज्य सरकारमधील असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी (मंत्री) राजकीय फायदा घेण्याचे ठरवले. काहीही झाले तरी डाव्या कालव्याची कामे (अपूर्ण का होईना ) परंतु पूर्ण दाखवून कळ आपल्याच (काळात) हाताने दाबायची असा जोर धरला. यामध्ये झालेल्या कामाचा कोणी दर्जा बघितला नाही. यात नुकसान कोणाचे होते. याबाबत लक्ष दिले गेले नाही. त्याचा दुष्परिणाम अकोले तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या शेतात तसेच घरात पाणी घुसले. कामाचा दर्जा खालावला होता. जाणीवपूर्वक उजव्या कालव्याचे काम लोकप्रतिनिधीने रखडवण्याचे पाप केले. चाचणी घेण्याच्या श्रेय वादामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली गेली. डावा आणि उजवा कालव्यातील शेतकऱ्यांमध्येच संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. संत गतीने चालू असलेल्या कामांमुळे सर्व सामान्य जनतेचे नुकसान होत आहे. धरणाच्या कामांची दिवसेंदिवस किंमत वाढत चालली आहे.
सर्वसामान्य जनतेतून कररूपी पैसा हा शासनाकडे जातो आणि त्यातूनच विकास कामे होतात हे कदाचित लोकप्रतिनिधी विसरले असावेत. त्यामुळे असे किती दिवस या निळवंडेच्या पाण्यासाठी आंदोलने, उपोषणे, रास्ता रोको करण्यास लावणार. हि शेवटची लढाई लोकशाही मार्गाने करायची आहे. सर्व मागण्या मान्य होईपर्यंत व शासनाकडून ठराविक कालावधीमध्ये आम्हास शेतीमध्ये पाणी उपलब्ध करून देणार असे लेखी आणि त्यावर चालू असलेले कामाची परिस्थिती बघूनच उपोषण मागे घ्यायचे की नाही. हे 182 गावातील शेतकरी ठरवतील. या उपोषणात निळवंडे लाभक्षेञातील 182 गावातील शेतकरी सहभागी होवून सर्वात मोठे आंदोलन छेडले जाणार असल्याचे दादासाहेब पवार यांनी सांगितले.