माळवाडगाव येथे पोलीस चौकी सुरू करा – संदिप आसने
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी पोलीस चौकी बाबत चर्चा करताना पत्रकार संदिप आसने व समवेत पोलीस उपाधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, पत्रकार रवींद्र आसने व आदी उपस्थित मान्यवर.
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे – तालुक्याच्या पूर्व भागातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माळवाडगाव येथे पोलीस चौकी सुरू करावी, अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे पत्रकार संदिप आसने यांनी केली आहे.
माळवाडगाव पोलीस बीट हरेगाव पोलीस दूरक्षेत्रांतर्गत येत असून या ठिकाणी पूर्वीपासूनच बीट कार्यान्वित आहे. मात्र माळवाडगाव हे गाव तालुका पोलीस ठाण्यापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. तसेच माळवाडगाव बीट अंतर्गत मुठेवाडगाव, खानापूर आणि भामाठाण ही गावे येतात. या परिसरात मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या घटना घडत आहे. या परिसरातील गुन्हेगारीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस चौकी कार्यान्वित करण्याची मागणी माळवाडगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत करण्यात आली असून पोलीस चौकीसाठी माळवाडगाव ग्रामपंचायतीच्या मालकीची एक खोली देण्याचा ठराव देखील माळवाडगाव ग्रामपंचायतीच्या २९ ऑगस्ट २०२२ रोजीच्या ग्रामसभेत एकमताने घेण्यात आला आहे.
याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने तसेच ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील अद्याप पर्यंत प्रशासनाकडून माळवाडगाव येथील पोलीस चौकी बाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे याबाबतीत पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन माळवाडगाव येथे पोलीस चौकी कार्यान्वित करावी, अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे संदिप आसने यांनी केली आहे.