साहित्य व संस्कृती

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या ‘शिवविजय’ वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन

प्रा. डॉ.राजेंद्र मोरे यांचे स्वागत व प्रा. डॉ.विठ्ठल शिवणकर यांना सदिच्छा

सातारा – येथील रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेजच्या शैक्षणिक वर्ष 2022- 23 च्या ‘शिवविजय’ या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर प्रिं. डॉ. शिवलिंग मेनकुदळे, महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे व प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांची बदली बळवंत कॉलेज, विटा येथे झाल्याच्या निमित्ताने महाविद्यालयातील स्टाफ वेल्फेअर समितीच्या वतीने शुभेच्छा व सत्कार समारंभाचे व नूतन प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील, रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील, प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या विचारांचा पाईक म्हणून एक निष्ठावंत रयत सेवक म्हणून काम करीत राहिल्यामुळे विविध संधी मिळत गेल्या. व्यक्तीची ओळख पदामुळे नाही तर त्याच्या कार्य- कर्तृत्वामुळे होत असते. प्रशासन करीत असताना हृदयातील मानवतावाद नेहमी जिवंत ठेवायला हवा. शिवाजी कॉलेजला असणारी एक दैदीप्यमान परंपरा लक्षात घेता या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम करणे नेहमी प्रेरणादायी व आनंददायक वाटले. सत्य व सचोटीने केलेले काम आनंद व समाधान देते. प्राचार्य राजेंद्र मोरे हे सुद्धा एक अनुभवाने समृद्ध असे परिश्रमी, अभ्यासू व सहकार्यांना विश्वास व पाठबळ देऊन कार्यप्रवण राहणारे यशस्वी प्राचार्य आहेत. ‘शिवविजय’ या वार्षिक अंकात विद्यार्थी – लेखक व कवींनी व्यक्त केलेल्या भाव भावना आणि विचार संवेदनशील वाचकाला निश्चितपणे नवीन दिशा देणारे ठरतील. संपादक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे व सर्व विभागीय उपसंपादकांनी या अंकासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे ‘शिवविजय’ चा हा अंक शिवाजी कॉलेजच्या परंपरेला साजेसा असा तयार झाला आहे.

महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी विचार व्यक्त करताना सांगितले की, रयत शिक्षण संस्थेचे पहिले महाविद्यालय म्हणून छत्रपती शिवाजी कॉलेजची एक वेगळी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हे कॉलेज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने सुरू झालेल्या क्लस्टर विद्यापीठाचे एक घटक महाविद्यालय आहे. अनेक नामवंत प्राचार्य यांनी या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केले आहे. अशा कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी मिळणे हे भाग्याचे आहे. रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, कॉलेज विकास समिती, आजी – माजी विद्यार्थी, सर्व सहकारी प्राध्यापक व शिक्षकेत्तर सेवक वर्गांच्या सहकार्याने प्रिं. डॉ. शिवणकर सरांनी ज्याप्रमाणे या कॉलेजच्या यशात, भौतिक सुख- सुविधांमध्ये भर टाकीत कॉलेजचा कायापालट केला त्याप्रमाणे विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध उपक्रमांची आखणी करून ते प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न राहील. प्राचार्य पदाचा गत तेरा वर्षाचा अनुभव असल्यामुळे व बळवंत कॉलेज विटा येथे नुकतेच नॅक समिती बेंगलोर कडून मूल्यमापन होऊन कॉलेजला A++ ग्रेड मिळवून देण्यात तेथील आम्ही सर्व सहकारी यशस्वी झाल्याने अनुभवाची एक शिदोरी पाठीशी आहे.

यावेळी रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर प्रिं. डॉ. शिवलिंग मेनकुदळे, उपप्राचार्य डॉ. रोशनआरा शेख, उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार वावरे, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा. गणेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ‘शिवविजय’ चे संपादक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी विभागीय संपादकांनी सहकार्य केल्याचे सांगितले. बंधुभाव हे सूत्र धरून शिवविजयचे मुखपृष्ठ तयार केल्याचे सांगितले. आज निर्मळ मन व चारित्र्याची अत्याधिक गरज असल्याने विद्यार्थी – लेखक कवींनी व्यक्त केलेले विचार वाचकाला समाज स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी गतीप्रवण करतील असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्टाफ वेल्फेअर समितीचे चेअरमन प्रा. डॉ. शिवाजीराव पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार स्टाफ वेल्फेअर समितीचे सदस्य प्रा. डॉ. संदीप किर्दत यांनी केले. यावेळी शिवाजी कॉलेज येथून सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड येथे प्रबंधक म्हणून बदली झालेले डॉ. अरुणकुमार सकटे यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. रामराजे माने- देशमुख, ज्येष्ठ प्रा. डॉ. रघुनाथ साळुंखे, कार्यालयीन अधीक्षक तानाजी संकपाळ, सोमनाथ जाधव, प्रा. डॉ. सविता मेनकुदळे, डॉ. कांचन नलवडे, डॉ. धनंजय नलवडे, प्रा. संदीप भुजबळ, प्रा.बाळासाहेब वाघ यांचेसह सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button