तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या 19 हजार कोटी रूपयांची कर्ज माफी योजनेचे अभिनंदन- अनिल औताडे
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : 9 ऑगस्ट 2023 रोजी होणाऱ्या क्रांतीदिनी कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटनेने श्रीरामपूर येथील शेतकरी संघटनेच्या कार्यालयात राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.
९ ऑगस्ट ला इस्लामपूर, सांगली येथे राज्यातील शेतकऱ्यांचा आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव व शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष तसेच अखिल भारतीय शिफाचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने एकत्र येण्याची भूमिका घेतली आहे. इस्लामपूर येथे होत असलेल्या राज्यव्यापी शेतकरी परिषदेच्या आयोजनासाठी बैठक पार पडली.
सदर बैठकीत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने १९ हजार कोटी रुपये कर्जमाफी योजना कुठलाही गाजावाजा न करता आणली. हे एक तेथील शेतकऱ्यांच्या दृष्टीने सरकारने उचललेले क्रांतिकारी पाऊलच म्हणावे लागेल. सदर कर्ज माफी योजनेत महाराष्ट्र सरकार प्रमाणे कुठलीही क्षेत्राची रकमेची व तारखेची अट न ठेवता पाच लाखांपर्यंतच्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली.
तसेच तेलंगणाचा बीएसआर पक्ष हा आजपर्यंतच्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने काम करणारा पक्ष सिद्ध झाला आहे. देशात आंध्र हे दुर्दैवाने शेतकरी आत्महत्येबाबत प्रथम क्रमांकावर होते. परंतु तेलंगणा राज्याने शेतकऱ्यांसाठी काम केल्याने सुदैवाने तेथील शेतकरी आत्महत्या पूर्णपणे थांबविण्यात राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी यश मिळाविले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी शेतकरी संघटना बीआरएस बरोबर काम करणार असल्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील व राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांनी निर्णय घेतला आहे.
याप्रसंगी जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बीआरएस पक्षात शेतकरी संघटनेचे अस्तित्व कायम ठेवून प्रवेश केल्याचे घोषित केले. प्रसंगी ॲड. काळे म्हणाले की, आपण गेल्या सात आठ महिन्यापासून के चंद्रशेखरराव मुख्यमंत्री तेलंगणा, बी.आर.एस महाराष्ट्राचे प्रमुख शंकरराव धोडगेपाटील व प्रभारी बी. जे. देशमुख यांच्याशी तीन ते चार वेळा बैठका रघुनाथदादा पाटील, कालिदास आपेट, क्रांतिसिह नानापाटील ब्रिगेडचे शिवाजीराव नांदाखिले समवेत झाल्या.
शेतकरी संघटनेची स्व. शरद जोशी यांची भूमिका काय होती त्याच विचारावर आम्ही काम करत आहोत. त्यामुळे संघटनेची भूमिकेबाबत सविस्तर चर्चा झाली. शेतकरी संघटनेच्या सर्व मागण्या बीआरएस पक्षाच्या अजेंड्यावर व जाहीरनाम्यात असणार आहे. तसेच आज तेलंगणात याबाबत अमंलबजावणी चालू आहे. त्यामुळे शेतकरी संघटना व बीआरएस यांची राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने दुर्दैवी आत्महत्या रोखण्याच्या दृष्टीने काय भूमिका व उपाय योजना असणार आहे हे इस्लामपूर मधील कार्यक्रमात घोषित होणार असल्याचे ॲड. काळे म्हणाले.
सदर परिषदेत दोन साखर व इथेनॉल कारखान्यातील हवाई अंतराची अट रद्द करा, साताबाऱ्यावरील सर्व कर्जासह पाणी पट्टी, विजबिल माफ करा, गोवंश व वन्य प्राणीजीव कायदा रद्द करा, सर्व शेतमालावरील निर्यात बंदी उठवा, एक रुपयात विमा संरक्षण न देता तेलंगणा प्रमाणे एकरी दहा हजार सरसकट द्या, शेतीला 24 तास अखंडित विज व पाणी मोफत द्या, आदी मागण्यांवर मार्गदर्शन होणार आहे.
तरी या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, उपजिल्हा अध्यक्ष हरिभाऊ तुवर, जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी जवरे, अहमदनगर युवा आघाडी अध्यक्ष बच्चू मोडवे, पशुवैद्यकीय शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब अदिक, रामदास पाटील धुमाळ विचार मंचचे अमृत धुमाळ, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष युवराज जगताप, नेवासा तालुकाध्यक्ष त्रिंबक भदगले, राहता तालुकाध्यक्ष योगेश मोरे, कर्जत तालुकाध्यक्ष रंनजीत सूल, ज्येष्ठ मार्गदर्शक सुदामराव औताडे, सी.वाय.पवार, विश्वनाथ गवारे, श्रीरामपूर युवा आघाडीचे शरद आसने, आप्पासाहेब आदिक, साहेबराव चोरमल, ॲड सर्जेराव घोडे, ॲड. कापसे, जिल्हा संघटक भास्कर तुवर, नेवासा युवा आघाडीचे डॉ.रोहित कुलकर्णी, देवा पाटील कोकणे, विष्णुपंत खंडागळे, गोविंद नाना वाघ, माळेवाडी सोसायटीचे अध्यक्ष संजय वमणे, कैलास पवार, कडू पाटील पवार, नारायण पवार, इंद्रभान चोरमल, बबन उघडे, सचिन कालंगडे, गोरख गवारे आदि कार्यकर्त्यांनी केले आहे.