जाणून घेऊयात कोण आहेत जुलै-२०२३ चे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे आयडॉल्स
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून मफुकृवि आयडॉल्स हा उपक्रम दोन वर्षापूर्वी सुरु झालेला आहे. जुलै महिन्यातील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे शेतकरी आयडॉल म्हणुन राजेंद्र देशमुख व कृषि उद्योजक आयडॉल म्हणुन जयेश पाटील यांची निवड झालेली आहे. राजेंद्र देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील शेतकरी असून कृषि पदवीधर जयेश पाटील हे मु.पो. पिंप्री, ता.जि. धुळे येथील कृषि उद्योजक आहेत.
शेतकरी आयडॉल श्री. देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील शेतकरी असुन त्यांनी दुष्काळावर मात करुन ड्रॅगन फ्रुट, द्राक्षे, सिताफळ, गोडचिंच, खजुर, शेवगा या पिकांची यशस्वी लागवड करून शेतीमध्ये पीक विविधता आणली आहे. त्याचप्रमाणे महात्मा फुले कृषि विद्यापीठ शिफारशीत खत व कीड व्यवस्थापनाचा अवलंब करून आर्थिक संपन्नता मिळवली.
तसेच धुळे कृषि महाविद्यालयाचे कृषि पदवीधर आयडॉल कृषि/पशु उद्योजक श्री. पाटील, मु.पो. पिंपरी, जि. धुळे यांनी माऊली दुग्ध व्यवसायातून उत्तम आर्थिक प्राप्ती करत 15 व्यक्तींना नियमीत रोजगार उपलब्ध केला आहे. श्री. पाटील यांनी 100 जाफराबादी म्हशी आणि 10 गीर गाईंचे उत्तम संगोपन करून दररोज 700 लिटर दुग्ध उत्पादन घेऊन हा व्यवसाय किफायतशीर केला आहे. कृषि विज्ञान केंद्र, धुळे येथील शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाद्वारे ते इतर शेतकर्यांना मार्गदर्शन करतात.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषि महाविद्यालये, कृषि संशोधन केंद्रे, कृषि तंत्र विद्यालये यांच्या दर्शनीय क्षेत्रात ही आयडॉल्स् प्रदर्शीत करण्यात येतात.