राजकीय

मुठेवाडगाव ग्रामपंचायत विखे-मुरकुटे गटाच्या ताब्यात

सत्ताधारी गटाचा दारुण पराभव

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील मुठेवाडगाव ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत दोन जागांसाठी मतदान घेण्यात आले. आज मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला. यात मुठेवाडगाव येथील दोन्ही जागांवर विखे- मुरकुटे गटाचे उमेदवार निवडून आले. 

श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव ग्रामपंचायत येथील दोन जागा रिक्त झाल्या होत्या. या दोन जागांसाठी दि. १८ मे रोजी मतदान घेण्यात आले होते. आज दि.१९ मे रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. यात मुठेवाडगाव येथील दोन्ही जागांवर भाजप व लोकसेवा विकास आघाडी प्रणित परिवर्तन पॅनलच्या सौ.संगीता शंकरराव मुठे व कानडे गटाच्या सौ.निर्मला शहाराम मुठे तर किशोर विश्वास साठे व सोमनाथ रामभाऊ रूपटक्के यांच्यात लढत झाली.

याठिकाणी एकूण ९४३ मतदानापैकी ८७५ मतदान झाले. त्यापैकी संगीता मुठे यांना ५५९ (विजयी) मते पडली. तर निर्मला मुठे यांना ३०७ (पराभूत) मते पडली तर किशोर साठे यांना ५५० (विजयी) तर सोमनाथ रूपटक्के ३१८ (पराभूत) मते मिळाली. दोन्ही जागेवर विखे मुरकुटे गटाचे विजय झाल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

मुठेवाडगाव ग्रामपंचायत पोटनिवडणूक ही कानडे गटाचे बाजार समितीचे माजी संचालक विश्वनाथ मुठे, माजी सरपंच भाऊसाहेब मुठे, रघुनाथ मुठे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बबनराव मुठे, विद्यमान सरपंच सागर मुठे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास मंडळ विरुद्ध ना. विखे पाटील यांचे कट्टर समर्थक भाजप तालुका उपाध्यक्ष डॉ.शंकरराव मुठे व माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे कट्टर समर्थक कारेगाव भागचे संचालक शिवाजी मुठे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन मंडळ अशी लढवली गेली. या निवडणुकीत भाजपचे तालुका उपाध्यक्ष डॉ. शंकरराव मुठे यांच्या पत्नी संगीता मुठे यांना उमेदवारी मिळाल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. मात्र या निवडणुकीत विखे मुरकुटे गटाने सत्ताधारी मंडळाचा दारुण पराभव करत दोन्ही जागांवर विजय मिळविला आहे. तसेच या ठिकाणी या दोन जागांच्या विजयामुळे सरपंच उपसरपंच पद देखील बदलणार असल्याचे चर्चा निकालानंतर लगेच सुरू झाली होती.

आमच्या घरात कोणतेही पद घेतले जाणार नाही- डॉ. मुठे

आज झालेला निकाल हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रामाणिक कामाचा विजय असून यामध्ये माझ्याविरुद्ध जे कटकारस्थान गावात केले जात होते आणि सत्तेसाठी डॉ. मुठे निवडणूक लढवत असल्याची चर्चा केली जात होती तर याचाही मी आज खुलासा करतो की, या निवडणुकीनंतर ग्रामपंचायतीचे कोणतेही पद आमच्या घरात घेतले जाणार नाही.

तुळशीराम महाराजांच्या मंदिरात घेतलेली शपथ खरीच घेतली

गावामध्ये विरोधकांनी सांगता सभेतून अफवा केली की, डॉ.मुठे यांनी संत तुळशीराम महाराज मंदिरात खोटी शपथ घेतली. मात्र मी घेतलेली शपथ खरीच होती आणि त्याचा प्रत्यय आज विरोधकांना आजच्या निकालातून आला आहे. तसेच मी सोसायटीच्या संचालक पदाचा देखील राजीनामा दिला आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button