महाराष्ट्र

कर्मवीर हे शिक्षण क्षेत्रातील जननायक होते- प्राचार्य टी. ई. शेळके

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 04 आक्टोबर 1919 रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून बहुजन हिताय बहुजन सुखाय ही गौतम बुद्धांची विचारधारा आणि महात्मा फुले यांचा सार्वजनिक सत्यधर्म समोर ठेवून शिक्षणयज्ञ सुरु केला, ते खरे जननायक होते, असे मत माजी प्राचार्य टी. ई शेळके यांनी व्यक्त केले.

येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठान, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान, साहित्य प्रबोधन मंचतर्फे पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 64 व्या पुण्यतिथी निमित्त श्रीरामपूरातील कर्मवीर चौकातील पुतळा पूजन, साहित्यिक मानवंदना, अभिवादन केल्यावर वाचन संस्कृती प्रतिष्ठान कार्यालयातील बैठक चर्चेत ते बोलत होते.

वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी अभिवादन करीत नियोजन केले. यावेळी माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, हणमंतराव शेळके, साहित्य प्रबोधन मंच अध्यक्ष डॉ. शिवाजी काळे, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव सुखदेव सुकळे यांनी पुष्पहार अर्पण करीत कर्मवीरांच्या कार्याला अभिवादन केले.

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी झाला तर त्यांचे महानिर्वाण 09 मे 1959 रोजी झाले. छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, संत गाडगे महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादिंच्या कार्य, विचारांचा आदर्श ठेवत ‘रयत’ ला त्यांनी सेवातीर्थ बनविले. कर्मवीरांनी स्वतः च्या मुलाला देखील संस्थेपासून दूर ठेवले होते.

‘रयत’ ही नि:स्वार्थी, सेवाशील आणि समर्पित माणसांची, सामाजिक परिवर्तनाची प्रयोगशाळा आहे. समाज शिक्षित आणि स्वावलंबी व्हावा, तो श्रमशील, ज्ञानशील आणि संस्कारशील व्हावा ही कर्मवीरांची ध्येयशीलता होती. हा विचार आचरणात आणणे हीच कर्मवीरांना खरी मानवंदना असल्याचे मत माजी प्राचार्य शंकरराव गागरे यांनी व्यक्त केले. डॉ. शिवाजी काळे यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button