धार्मिक

माळवाडगाव येथे पंचदिवशीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे – तालुक्यातील माळवाडगाव येथील हनुमान मंदिर प्रांगणातील ७५ फूट उंच धर्मध्वज प्रथम वर्धापन दिनानिमित्त दि. १९ ते २३ एप्रिल या कालावधीत पंचदिवशीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

येथील हनुमान मंदिर प्रांगणात सद्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने महंत रामगिरीजी महाराज, महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षी ७५ फूट उंचीचा धर्मध्वज बसविण्यात आला. या धर्मध्वजास यावर्षी अक्षय तृतीयास एक वर्ष पूर्ण होत असल्याने ग्रामस्थांच्या वतीने पंचदिवशीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दररोज सायंकाळी ४ ते ५ या वेळेत हरिपाठ, ५ ते ७ वेळेत महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची कीर्तन, त्यानंतर अन्नदान होणार आहे. पहिल्या दिवशी दि.१९ रोजी कीर्तन केसरी अक्रूर महाराज साखरे गेवराई, दि. २० राष्ट्रीय किर्तनकार समाज प्रबोधनकार सुनीताताई आंधळे आळंदी देवाची, दि. २१ समाज प्रबोधनकार भागवताचार्य रुपालीताई सवणे परतूरकर, दि. २२ किर्तन केसरी स्वररत्न संतोष महाराज वनवे बीड, यांचे कीर्तन होईल. रविवार दि. २३ रोजी सकाळी ९.३० वा. गोदावरी धाम श्रीक्षेत्र सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल.

समस्त ग्रामस्थांच्या महाप्रसाद पंगतीने पंचदिवशीय कीर्तन महोत्सवाची सांगता होणार आहे. तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी भव्य दिव्य अशा पंचदिवशीय कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन धर्मध्वज उत्सव समिती व समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ माळवाडगाव यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button