पुनरुत्थान म्हणजे एकमेकांना नवीन जीवन देणे व घडविणे – फा.जेम्स थोरात
हरिगाव येथे इस्टर सण उत्साहात
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : इस्टर म्हणजे पुनरुत्थित ख्रिस्त व पुनरुत्थान म्हणजे एकमेकांना नवीन जीवन देणे व जीवनात नवीन काहीतरी घडविणे, असे प्रतिपादन हरिगाव संत तेरेजा चर्च येथे इस्टर उत्सवात ज्ञानमाता विद्यालयाचे प्राचार्य व धर्मगुरू जेम्स थोरात यांनी केले.
पुढे बोलताना धर्मगुरू जेम्स थोरात म्हणाले, आज पूर्ण जगभर प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनर्रुत्थानाचा उत्सव साजरा केला जात आहे. ही एक ऐतिहासिक अशी घटना आहे आणि फक्त ऐतिहासिक नाही तर हा फार मोठा चमत्कार पूर्ण जगात झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांसाठी क्रुसावर आपला अर्पण दिला आहे.
अगदी सुरुवातीला जेव्हा त्याने पवित्र पित्याची आज्ञा प्रमाण मानली. त्यावेळेपासून त्यांच्या आईने पवित्र मरीयेने हो म्हटले आणि तेथूनच तारणाची पहाट उजाडली. प्रभू येशू ख्रिस्ताने पापावर, अंधारावर, आणि सैतानावर विजय मिळविला व तोच आज पुनरुत्थित झालेला आहे. त्याच पुनरुत्थानाची पहाट आज आपण साजरी करीत आहोत.
जगात अशी एकच व्यक्ती आहे की, ज्या व्यक्तीचे पुनरुत्थान झालेले आहे. सर्वजण येतात आपापले कार्य करतात आणि ज्यावेळेस पिता परत बोलावतो त्यावेळेस पिताच्या घरी जातात. परंतु प्रभू येशू अशी एकच व्यक्ती आहे, ती मरणानंतर तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला आहे आणि पुनरुत्थित झाला आहे. त्याने प्रकाशात आपल्या सर्वाना आणले आहे. म्हणून आपण जेव्हा इस्टरमध्ये मेणबत्ती वापरतो ते प्रकाशाचे चिन्ह आहे.
परमेश्वर प्रकाश आहे आणि तो अंध:कार दूर करत आहे. या व्यावहारिक जीवनात जीवन जगत असताना तो प्रत्येकापर्यंत पोहोचला. पित्याचे प्रेम सर्वाना दिले. ते प्रेम देतादेता त्याने स्वत:चे बलिदान क्रुसावर समर्पित केले आहे. परंतु तेथ पर्यंत थांबलेले नाही तर त्याचा हा प्रकाश आज त्याने प्रत्येक कुटुंबात तेवत ठेवलेला आहे आणि म्हणून पास्काची मेणबत्ती पेटवत ठेवतो. त्याचा अर्थ तोच आहे की परमेश्वर आपल्याला नवजीवन देत आहे. नवजीवनात आपण प्रकाशात वाढत आहोत आणि नवजीवनात प्रवेश करून शेवटपर्यंत त्याच्या तारण कार्यात सहभागी होत आहोत. हाच इस्टर सणाचा अर्थ आहे.
इस्टर दिनी हरिगाव धर्मगुरू डॉमनिक, रिचर्ड आदी सहभागी होते. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इस्टर सणानिमित्त उद्योजक अशोकराव कानडे, अरुण नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, ग्रा.प.सदस्य सुनील शिणगारे, सरपंच सुभाष बोधक, सुभाष पंडित, युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, सुरेश गलांडे, युवराज भालदंड, अमोल नाईक, बी सी मंडलिक, डी एस गायकवाड, ज्यो दिवे, सी एम गायकवाड आदींनी शुभेच्छा दिल्या.