शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून मदत करावी- सुरेशराव लांबे पाटील
राहुरी | प्रतिनिधी : राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये चालू आठवड्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊसाने कांदा, गहु व इतर भुसार शेती मालाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून शासन व प्रशासन यांनी तातडीने पंचनामे करून अतिवृष्टीचे पहिले अधिक चालू असे एकरी 50 हजार रुपये मदत शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करावी अन्यथा सरकार मध्ये सहभागी असून सुद्धा प्रहार जनशक्ती पक्षाला आंदोलनाचा पवित्रा घेवा लागेल, असा इशारा राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी दिला.
श्री. लांबे पाटील हे राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने डिग्रस, बाभुळगाव व वरवंडी येथे मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना वरवंडी येथील मतदार भाऊसाहेब सिद्धू काळे यांच्या घरी गेले असता त्यांचे कुटुंब चिंताग्रस्त अवस्थेत बसलेले असताना त्यांनी त्यांच्या चार एकर कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती दिली. त्यावेळी त्यांच्या शेतात समक्ष जाऊन पाहणी करून तुमच्या भावना शासनापर्यंत पोहोचून तुम्हाला तुमच्या पिकाचे पंचनामे करून शासनाकडून तातडीने मदत मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाही देऊन त्यांना दिलासा दिला.
श्री. लांबे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बद्दलच्या भावना मांडत असताना सरकारवर नाराजी व्यक्त केली. गेले दोन-तीन वर्षापासून अतिवृष्टी कोरोना या कारणाने शेतकऱ्यांवर मोठे संकट येत आहे. अजूनही अवकाळी थांबायला तयार नाही. गेल्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याचे अनेक वेळा पंचनामे झाले. परंतु शासनाची अतिवृष्टीची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यातच चालू आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. तरी शासनाने शेतकऱ्यांच्या पिकाचे त्वरित पंचनामे करून पहिली अधिक आत्ताची मदत शेतकऱ्यांना तातडीने देऊन सहकार्य करावे.
शेतकरी व सर्वसामान्यांचे नेते माजी मंत्री आमदार बच्चुभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर आजवर आवाज उठवलेला आहे. शिंदे फडणवीस सरकारने काही प्रमाणात त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या असून कष्टकरी शेतकऱ्यांच्या इतर मागण्या मान्य न केल्यास प्रहार जनशक्ती पक्ष सत्तेत सहभागी असून सुद्धा शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असा सुचक इशारा राहुरी नगर पाथर्डी व राहुरी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी दिला.