सामाजिक

सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार सुभाष दरेकर यांना जाहीर

श्रीगोंदा : स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने ” मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा ” राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२३ हा अखिल भारतीय क्रांतिसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख सुभाष दरेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. जागतिक महिला दिनी हा पुरस्कार सिनेअभिनेत्री अलका कुबल- आठल्ये यांच्या हस्ते देण्यात येणार असल्याची माहिती स्वराज्य सरपंच सेवा संघाचे संस्थापक बाबासाहेब पावसे यांनी दिली आहे.
अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या माध्यमातून दरेकर यांनी नेहमीच विविध सामाजिक प्रश्न, मागण्या रोखठोक व प्रभावीपणे मांडल्या आहेत. सुभाष दरेकर यांनी आपल्या आक्रमक भूमिकेतून नेहमीच समाजातील दुर्लक्षित नागरिकांचे प्रश्न मार्गी लावून समाजात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. विशेषकरून ते सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. गोरगरीबांची कामे मार्गी लावणे हेच डोळ्यासमोर ध्येय असते.
दरेकर हे सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील असून त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही जिद्द व संघर्षातून त्यांनी क्रांतीसेनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. हा सन्मान सोहळा दि. ८ मार्च २०२३ रोजी अहमदनगर येथील माऊली संकुल सभागृहात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

    सरपंच सेवा संघाच्या वतीने ” मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा ” राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२३ हा सुभाष दरेकर यांना जाहीर झाल्याबद्दल क्रांतीसेनेच्या मार्गदर्शिका माजी महसूलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील, अध्यक्ष संतोष तांबे पाटील, सरचिटणीस नितीन देशमुख, संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button