अहमदनगर

प्रशासनाच्या मध्यस्तीने गुहा येथे कानिफनाथ महाराज यात्रेची जय्यत तयारी

राहुरी – रविवार दि.१२ मार्च रोजी राहुरी तालुक्यातील गुहा येथे कानिफनाथ महाराज यात्रोत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी ग्रामस्थ व श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट तयारीला लागले आहेत.
गुहा गावचे ग्रामदैवत कानिफनाथ महाराज यात्रा शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. गुहा गावात यात्रा सर्व धर्मातील ग्रामस्थ शांततेत एकोप्याने पार पाडत असतात. परंतु काही दिवसांपासून गुहा गावात दोन समाजात तेढ निर्माण झाल्यामुळे सामाजिक वातावरण दुषित झाले होते. महसूल प्रशासन व पोलिस प्रशासन यांनी दि.७ मार्च रोजी राहुरी येथे गुहा गावातील दोन्ही समाजाच्या नागरिकांनी यात्रोत्सव शांततेत पार पाडावा, यासाठी शांतता बैठक घेण्यात आली होती. दोन्ही गटातील नागरिकांमध्ये सामंजस्य साधण्यात तहसिलदार एफ.आर.शेख व पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांना यश आल्याचे सध्यातरी दिसत आहे.
शांतता बैठकीत ठरल्याप्रमाणे शनिवार दि.११ मार्च रोजी सायं.६ वा. मानाचा नैवैद्य व मानाच्या काठी मिरवणूक होणार आहे. रविवार दि.१२ मार्च रोजी सकाळी ८ वाजता प्रवरा नदी येथून आणलेल्या गंगाजल कावड यात्रेची मिरवणूक निघून गंगास्नान व महापंचामृत अभिषेक होणार आहे. सायंकाळी ६ वा. काठी व छबिना मिरवणूक तर रात्री ९ वा. भक्तीगीतांचा सुमधुर गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवार दि.१३ मार्च रोजी सायंकाळी ४ वा. जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
गुहा ग्रामस्थ व यात्रा कमिटीने मंदिर परिसर एकत्रित येत श्रमदानाने स्वच्छ केला आहे. गुहा गावात आजूबाजूच्या परिसरातील तसेच पर जिल्हातील खेळणी दुकानदार, रहाट पाळणे, हलवाई दुकानदार तसेच इतर व्यावसायिकांच्या दुकानांसाठी स्वतंत्र जागेची साफसफाई केलेली आहे. यात्रे निमित्त बाहेर गावावरून येणाऱ्या व्यावसायिकांना कुठलाही त्रास होवू नये म्हणून यात्रा कमिटीने सर्व नियोजन केले असल्याचे सांगण्यात आले आहे.
गुहा गावातील यात्रा दि.१२ व १३ मार्च रोजी होणार असून यात्रा शांततेत पार पाडावी म्हणून पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली डी.वाय.एस.पी. संदीप मिटके यांच्या आदेशाने पो.नि.मेघशाम डांगे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

Related Articles

Back to top button