महापशुधन एक्स्पो 2023 प्रदर्शनात महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा सहभाग
राहुरी विद्यापीठ : शिर्डी येथे महाराष्ट्र शासनाच्या दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने दि. 24 ते 26 मार्च, 2023 या कालावधीत आयोजित महापशुधन एक्स्पो 2023 या प्रदर्शनात कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विद्यापीठाचे प्रदर्शन दालन मांडण्यात आले होते.
या दालनामध्ये लुसर्न, बरसिम, ओट, मका व संकरीत नेपीअर या वाणांचे सजीव नमुने व देशी गाय उत्पादने शेतकर्यांना पाहण्यासाठी मांडण्यात आले होते. त्याचप्रमाणे देशी गाय संशोधन प्रकल्प, पुणे यांच्यातर्फे देशी गायीचे दुग्ध उत्पादन, विविध उत्पादने प्रमुख्याने गांडुळखत, शेणापासून गणपती मुर्ती, पणत्या व इतर उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षणाबद्दल माहिती देण्यात आली.
या प्रदर्शन दालनास कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ व नागपूर येथील माफसू विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख व पुण्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. सत्येंद्रप्रकाश सिंग यांनी भेट देवून शास्त्रज्ञांना प्रोत्साहीत केले. यावेळी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे यांनी मान्यवरांना माहिती दिली. याप्रसंगी मान्यवरांनी तसेच विविध अधिकारी व शेतकर्यांनी विद्यापीठाने प्रसारीत केलेले वाण व तंत्रज्ञानाची माहिती घेतली.
प्रदर्शन दालनामध्ये कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. दत्तात्रय पाचारणे, डॉ. ए.व्ही. अत्तार, डॉ. जी.के. वामन, डॉ. सोमनाथ माने, डॉ. धीरज कणखरे व नवनाथ दराडे आदींनी प्रदर्शन कालावधीत दालनास भेट देणार्या मान्यवर तसेच शेतकर्यांना माहिती दिली.