ठळक बातम्या

उंदीरगाव येथील नागरिकांवर पाण्यासाठी आंदोलनाची वेळ

हंडा मोर्चा, टाळेठोक आंदोलन व आश्वासन

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : उंदीरगाव येथील आऊटसाईड हाऊसिंग सोसायटीत मागील बऱ्याच वर्षापासून पाण्याची व्यवस्था केली जात नसल्याने संतप्त नागरिकांनी आज पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढत कार्यालयाला टाळे ठोकले.

सविस्तर वृत्त असे की, आऊटसाईड हाऊसिंग सोसायटीत मागील बऱ्याच वर्षांपासून पाण्याची व्यवस्था केली जात नसल्याने संतप्त नागरिकांच्या धैर्याचा अंत सुटल्याने ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला होता. परंतु याप्रसंगी ग्रामपंचायत कार्यालयात कुठलाही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याने संतप्त नागरिकांनी कार्यालयास टाळे ठोकत आक्रमक पवित्रा घेतला.

साडेअकराच्या दरम्यान ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामसेवक आल्यानंतर ग्रामसेवक यांनी पुढील एक महिन्यात उंदीरगाव आऊटसाईड सोसायटीच्या परिसरात दोन बोअरवेल घेऊन परिसरातील नागरिकांच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.

या टाळे ठोक आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल पंडित आणि मेजर अभय फुलारे यांनी केले. यावेळी स्वप्निल पंडित यांनी पुढील एक महिन्यात पाण्याची व्यवस्था झाली नाही तर श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, यातुन निर्माण होणाऱ्या परिणामांना ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहील असा इशारा दिला आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button