साहित्य व संस्कृती
मराठी भाषेची गुणवत्ता अभ्यासू आणि साहित्यिक वाढवितात- डॉ. बाबुराव उपाध्ये
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : डॉ.सुभाष वाघमारे यांनी प्रा.भगवान पाटील यांचा ‘प्रेरणास्तंभ ‘ संपादित केलेला गौरव ग्रंथ म्हणजे मराठी भाषेची कृतज्ञतापूजा असून मराठी भाषेची गुणवत्ता डॉ. सुभाष वाघमारे सारखे अभ्यासू आणि जाणकार साहित्यिकच वाढवितात असे मत जेष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
येथील ग्रामीण साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांचे रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज (स्वायत्त ) सातारा येथे मराठी विभागातर्फे मराठी भाषादिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवर्य प्रा. बी. डी. पाटील गौरवग्रन्थ प्रकाशन,’ मराठी विभाग विकास व मराठी भाषा संवर्धन : आपली जबाबदारी ‘ परिसंवाद, मराठी विषयाच्या माजी विद्यार्थ्याचा मेळावा या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य मा के. यादव होते. प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव, ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, माजी प्राचार्य श्रीधर हेरवाडे, प्रा. डी.ए. माने, प्रा. भगवान पाटील, प्रा. डॉ. शिवाजी पाटील, प्रा. उत्तमराव सूर्यवंशी, प्रा. डॉ.नलिनीताई महाडिक, प्रा.डॉ.मानसी लाटकर, प्रा.डॉ. मीराताई देठे आदी व्यासपीठावर विराजमान होते. संयोजक, मराठी विभाग प्रमुख डॉ. सुभाष वाघमारे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, पाहुण्यांचा सत्कार करण्यात आले. डॉ.सुभाष वाघमारे यांनी कृतज्ञता / मानपत्राचे वाचन केले. मराठी विभागातर्फे पाहुणे, प्राध्यापक, विद्यार्थी यांना सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले.
छत्रपती शिवाजी कॉलेज(1947ते 2022)चा ‘ शिवविजय ‘ अमृतमहोत्सवी अंक प्रकाशित करण्यात आला. यावेळी प्रा. भगवान पाटील, प्रा. डी. ए. माने त्यांच्यासह अनेकांनी मनोगते व्यक्त केली. सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल डॉ. सुभाष वाघमारे, मराठी विभाग यांचे मनापासून कौतुक केले. डॉ. बाबुराव उपाध्ये आपल्या भाषणात पुढे म्हणाले, ज्ञानक्षेत्रातील जेष्ठ, तपस्वी व्यक्तींच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा प्रेरणादायी आहे. 86, 82, 72 वर्ष वय असलेले आणि रयतनिष्ठ व्यक्तिमत्वे यांच्या आठवणी म्हणजे एक प्रेरणादायी इतिहास आहे.
डॉ. सुभाष वाघमारे यांच्या मनातील कृतज्ञता आनंदभावनेतून आयोजित केलेला हा सोहळा म्हणजे एक ज्ञानयज्ञ आहे, कर्मवीरांचा सहवास आणि संस्कार लाभलेली ही व्यक्तिमत्वे एकत्र आणण्याचे कौशल्य दाखविल्याबद्दल संयोजकांचे वेगळेपण दिसून येते. मराठी ही आपली ज्ञानभाषा आहे, तिच्या विकासात आणि प्रतिष्ठेत महाराष्ट्र मातीचा, संस्कृतीचा, माणसांचा गौरव आहे. संशोधक, अभ्यासू, साहित्यिक हे आपल्या लेखन, वाचन, संवाद आणि उपक्रमातून बळ देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रा.पोपटराव काटकर, प्रा. विश्वजित जाधव यांनी सूत्रसंचालन केले, प्रा.डॉ.शरद गायकवाड यांनी आभार मानले.