कृषी

मधमाशीपालन ही काळाची गरज – डॉ. सी. एस. पाटील

नॅशनल बी बोर्ड द्वारे माळेवाडी येथे सात दिवसीय मधमाशी कार्यशाळेचे उद्घाटन
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : मानवाला मिळणाऱ्या अन्नाच्या प्रत्येक तीन घासातील एक घास मधमाशिद्वारे केलेल्या पराग सिंचनामुळे मिळतो. उत्पादन वाढीसाठी केल्या जाणाऱ्या विविध प्रयत्नांमध्ये मधमाशीला पाहिले स्थान देने ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ कृषी कीटकशास्र विभाग प्रमुख डॉ. सी. एस. पाटील यांनी केले. 
भारत सरकारच्या राष्ट्रीय मधमाशी व मध मिशन अंतर्गत माळेवाडी ता. श्रीरामपूर येथे नॅशनल बी बोर्ड प्रायोजित सात दिवसीय स्टिंगलेस मधमाशी पालन कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माळवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. जयश्री सोपान औताडे यांनी भूषविले.
प्राचीन काळापासून विविध व्याधींवर स्टिंगलेस मधमाशीच्या मधाचा औषध म्हणून उपयोग होत असून, मध रक्तात लवकर मिसळत असल्याने त्वरित कार्यशक्ती मिळते. 80 % आयुर्वेदिक औषधे ही मधाबरोबरच घेतली जातात कारण त्यामुळे आयुर्वेदिक औषधांची परिणामकारकता वाढत असल्याबाबतची माहिती पुणे येथील मध्यवर्ती मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माजी शास्रज्ञ डॉ. डेझी थॉमस यांनी दिली. 
नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या सहयोगातून गोदागिरी फार्म्स यांच्याद्वारे २५ शेतकऱ्यांसाठी सदर निवासी प्रशिक्षण २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी कालावधीत विनामूल्य उपलब्ध होत असून, दुर्लक्षित स्टिंगलेस मधमाशी (पोया मधमाशी) पालनातुन परागीभवन, वसाहत विक्री व आयुर्वेदिक मध निर्मितीमधून विशेषकरून महिलांना गावातच कुटिरोद्योगाची संधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही जनरल मॅनेजर अभिजित भट्टाचार्याजी यांनी दिली.
कार्यक्रम प्रसंगी माळेवाडी वि. वि. का. सो. चेअरमन भरत वमने, दिगंबर औताडे, देविदास वमने, तुषार औताडे, दत्तात्रय औताडे, निलेश जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते. सात दिवस प्रशिक्षणासाठी माळेवाडी गावातील शेतकरी तसेच पुणे, मुंबई, परभणी या ठिकाणाहून आलेले प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन ऋषीकेश औताडे यांनी केले तर आभार प्रदर्शन किशोर थोरात यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी माळेवाडी शेतकरी उत्पादक कंपनी यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Back to top button