अहमदनगर
गडद धुक्यात हरवली सोमवारची सकाळ
बाळकृष्ण भोसले | राहुरी : तालुक्यात आजची सकाळ गडद धुक्यात अक्षरशः हरवली. फुटावरचेही दिसत नसल्याने सर्वच रस्त्यांवर काहीकाळ अघोषित संचारबंदी पहावयास मिळाली. जमीनीवर आकाश पांघरल्याचा अनुभव अबालवृद्धांसह पशुपक्षांना काहीकाळ अनुभवता आला. पक्षीही आज उशीराने बाहेर पडताना दिसले.
तालुक्यात सर्वत्र आजची सकाळ दाट धुके घेवूनच प्रवेशती झाली. पुर्वेच्या सुर्योदयाऐवजी गडद धुक्याचे लोळ दार उघडताक्षणी कायमच्या पै- पाहुण्यासारखे सराईतपणे घरात प्रवेशते झाले. दाट धुक्याची चादर त्यात हलकासा वारा अशा वातावरणाने एरवी आकाशात पळणारे ढग जमिनीवरून पळत असल्याचे विहंगम दृष्य सर्वत्र पहावयास मिळाले.
अहमदनगर – मनमाड या तालुक्यातून जात असलेल्या महामार्गावरील वाहतूक या धुक्याने ठप्प झाली. त्यामुळे रस्त्यांवर अघोषित संचारबंदी अवतरली होती. छोट्या वाहनांचे चालक अशा परिस्थितीत वाहनाचे दिवे सुरू करत पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दिसले. मात्र त्यात त्यांना फारसे यश येताना दिसले नाही. अवघ्या फुटावरचेही दिसत नसल्याने अवजड वाहनचालकांनी आहे. तिथेच वाहने थांबवणे पसंत केले तर प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग व अन्य शिवार वाहतूक व पाणंद रस्त्यांवरची स्थानिक रहदारीवरही परिणाम जाणवला. या धुक्याने मात्र आंबा मोहोर व कांदा पिकांना फटका बसण्याची शक्यता शेतकरी वर्गाने वर्तविली. सकाळी ९ नंतर हे धुके हळूहळू ओसरण्यास सुरूवात झाली.