कृषी

कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ व कृषि विभागाचे अधिकारी शेतकर्यांच्या बाधांवर

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील वनस्पती रोगशास्त्र विभाग व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने राज्यभर राबविण्यात येणार्या फलोत्पादन पिकांवरील किड रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) मार्फत मफुकृवि., राहुरीच्या हॉर्टसॅप प्रकल्पातील संशोधन सहयोगी डॉ. प्रविण खैरे, अकोले तालुक्याचे मंडळ कृषि अधिकारी डॉ. रविंद्र रोकडे, कृषि पर्यवेक्षक रायभान गायकवाड, कृषि सहाय्यक हरिभाऊ जाधव यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील पिंपळगाव नाकविंदा, शरंखेळ व धामनगाव आवारी या गावांना भेटी दिल्या.
या भेटी दरम्यान या चमूने शेतकर्यांच्या शेतावर जाऊन टोमॅटो उत्पादक शेतकरी यांच्याबरोबर सविस्तर तांत्रिक चर्चा केली. चर्चेदरम्यान शेतकर्यांना रोग व किड नियंत्रणाचे मार्गदर्शन करुन टोमॅटोच्या अधिक व निरोगी उत्पादनासाठी सविस्तर माहिती दिली. सध्या रब्बी हंगामात या भागात लागवड केलेल्या टोमॅटोची तोडणी सुरु झालेली असुन काही प्रक्षेत्रांची तोडणी सुरु होणार आहे. तसेच काही शेतकरी उन्हाळी हंगामासाठी टोमॅटो लागवडीची तयारी करत आहेत. सध्या शेतकर्यांच्या टोमॅटो पिकावर रसशोषण करणार्या किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामध्ये फळ पोखरणारी अळी व टूटा नागअळी या किडींचा व बुरशीजन्य करपा या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येत आहे.
त्या अनुषंगाने कीड व रोगाच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकर्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेलेल्या गावांसाठी हॉर्टसॅप प्रकल्पांतर्गत वेळोवेळी एन.सी.आय.पी.एम., नवी दिल्ली या संकेतस्थळावर विद्यापीठामार्फत सदर पिकासाठी पिकसरंक्षण सल्ला दिला जातो. तसेच टोमॅटो पीक कीड व रोग नियंत्रण सल्ला यांच्या घडी प्रत्रिका शेतकर्यांना देण्यात आल्या. सदर प्रक्षेत्र भेटीसाठी प्रकल्प समन्वयक तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, समन्वयक तथा सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय कोळसे व टोमॅटो सुधार योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. अनिकेत चंदनशिवे यांनी मार्गदर्शन केले.

Related Articles

Back to top button