औरंगाबाद

समांतर जलवाहिनीच्या नियोजन शुन्य कारभारामुळे वाहतूकीस अडथळा; वाहतूक सुरळीत करावी प्रवाशांची मागणी

विलास लाटे – पैठण औरंगाबाद मुख्य रस्त्यावरील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यासमोर रस्त्याच्या एका बाजूला चालू असलेल्या समांतर जलवाहिनीच्या कामामुळे वाहतुकीचा चक्का वारंवार जाम होत आहे. हे काम करत असताना वाहतुकीचे नियोजन न करता मागील अनेक दिवसांपासून काम सुरू असताना खोदकाम करणाऱ्या यंत्रसामग्रीचा वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र तरीही याकडे संबंधिताचे सर्रास दुर्लक्ष होत असल्याने वाहन धारकांसह प्रवाशातून रोष व्यक्त केला जात आहे.
या रस्त्यावर चितेगाव तसेच पैठण एमआयडीसी असल्याने वाहनाची मोठी वर्दळ असते. त्यात आधीच हा रस्ता अरुंद आहे. त्यात समांतर जलवाहिनीच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामुग्रीची भर पडली आहे. सध्या पावसाळ्याच्या दिवसात समांतर जलवाहिनीचे काम सुरू आहे. या कामासाठी बुलडोजर, क्रेन अशी यंत्रे आडवे लावून सर्रास सदरिल काम चालू आहे. त्यामुळे वाहनधारकांना रस्त्याच्या बाजूने रस्ता काढत जावे लागत आहे.
सध्या खोद कामामुळे या रस्त्यावर व रस्त्याच्या बाजूने पाऊसामुळे चिखल झाला आहे. यामुळे जड वाहने, बस, ट्रॅक्टर, ट्रक या चिखलात रुतुन बसत आहे. त्यामुळे अनेक वाहनांचा वारंवार चक्का जाम होत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. यामुळे वाहनधारकांना आणि दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी प्रवाशांना याचा नाहक त्रास होत आहे. मात्र यासंदर्भात कुठलीच पर्वा न करता अथवा बाजुने पर्यायी रस्त्याची व्यवस्था न करता मागील अनेक दिवसांपासून हे काम अतिशय संथगतीने (पावसाच्या व्यत्ययामुळे) सुरू आहे.
या होत असलेल्या दररोजच्या त्रासाने वाहनचालकांसह प्रवाशातून संताप व्यक्त केला जात आहे. मात्र संबंधित यंत्रणेला याचे काहीच देणेघेणे दिसत नाही. हे सर्व बघून याकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप वाहनधारक, प्रवासी करत आहेत. हि होणारी गैरसोय लक्षात घेऊन संबंधित गुत्तेदार आणि प्रशासकीय यंत्रणेने याची दखल घेऊन जिथे जिथे गरज भासेल त्या-त्या ठिकाणी काम होईपर्यंत पर्यायी व्यवस्था प्राधान्याने करावी, अशी मागणी प्रवाशी मित्र केदार मिरदे, कृष्णा पाटणकरसह वाहनधारक, प्रवासी व परीसरातील नागरिक करत आहेत.

Related Articles

Back to top button