औरंगाबाद

हाताला रोजगार, शेतीला रस्ते व घरोघर पाणी उपलब्ध करून देणार – मंत्री भुमरे

विजय चिडे/पाचोड : मतदारांच्या आशिर्वादाने आपणांस मिळालेल्या मंत्रीपदाचा फायदा आपण त्यांच्याच हितासाठी करणार असुन पैठण तालुका टॅंकरमुक्त करण्यासोबतच आपण रोहयो अंतर्गत रिकाम्या हातांना रोजगार अन् शेतीला रस्ते उपलब्ध करून देण्यासोबतच पैठणच्या पैठणीला गतवैभव प्राप्त करून देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी पाचोड (ता.पैठण) येथे केले. शनिवारी (ता.२७) पाचोड (ता.पैठण) येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा प्रकल्पाच्या भुमिपुजनाप्रसंगी मंत्री भुमरे बोलत होते. 

मंत्री भुमरे पुढे म्हणाले, मराठवाड्यातील सर्वात मोठे मोसंबी संशोधन व रोपवाटीका केंद्र पैठण येथे ६२ एकर क्षेत्रावर उभारले जाणार असुन अर्थसंकल्पात त्यास मंजुरी देण्यात आली. यात नवीन जाती तयार करणे, पाणी व्यवस्थापन, कीड नियंत्रण, फळप्रक्रिया, रोगमुक्त मोसंबी रोपांची निर्मिती केली जाणार आहे. मोसंबीचे क्षेत्र वाढीसह उत्पादनात वाढ होईल. तेथे दर्जेदार मोसंबीसह अन्य रोपे निर्मिती केली जाणार आहे. मराठवाड्यात मोसंबीचे एकूण ५५ ते ६० हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्या पैकी पैठण तालुक्यात १० हजार हेक्टर क्षेत्रावर मोसंबीची लागवड आहे. नाशवंत मोसंबी व वाढते क्षेत्र लक्षात घेऊन पाचोड येथे शीतग्रह, प्रतवारी, फळांना चकाकी देणारी अत्याधूनिक यंत्रणा उभारली जाणार असून येत्या नऊ महीन्यात हा प्रकल्प पुर्ण होईल. त्यामुळे मराठवाडयाच्या मोसंबीला परदेशात मागणी वाढुन त्याचा दर्जा सुधारेल व मोसंबीला चांगले दर मिळून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होईल. 

शेतकऱ्यांना शासनाच्या नव्हे तर स्वयं मर्जीने दोन झाडांच्या ओळीतील लागवडीचे अंतर ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येकांना रोजगार मिळावा म्हणुन गावागावांत मोहगणीची लागवडीला मंजुरी दिली. त्यास २ लाख ५६ हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित करण्यात आले, तर ३४ x ३४ च्या शेततळ्यास रोहयो अंतर्गत मंजुरी देऊन त्यात टाकण्यात येणाऱ्या आच्छादन घेण्याची तरतुद करण्यात आली. शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी रस्त्याची अडचण लक्षात घेऊन पूर्वी मिळणारा एक लाखाचा निधी आता मातोश्री पाणंद योजनेतर्गत २४ लाखावर नेला. प्रत्येक शेतीला शेतातील उत्पादीत माल बाहेर काढण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देणार असून सर्वत्र त्याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

त्यासाठी निधीची कोणतीच अडचण नाही. मंत्री होण्यापूर्वी पाच विहीरी मिळत होत्या. आता त्यात लोकसंख्येनुसार वाढ केली. तालुक्यात ८०० वर विहीरी, ६००० गोठे हजारो हेक्टरवर मोहगणी लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. रोहयो योजनेतुन प्रत्येक गावात पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार असून ब्रम्हगव्हाण उपसा योजनेत पाचोड, लिंबगाव, रांजनगाव, कडेठाण, कोळी बोडखा आदी गावांचा समावेश केला. ८९० कोटी खर्चाच्या सुप्रिमो योजनेतंर्गत समुद्रात जाणारे पन्नास टि.एम.सी.पाणी मराठवाडयात वळविणार असुन २९७ कोटी रुपये खर्चाच्या वॉटर पावरग्रिड योजनेतंर्गत प्रति डोई ५० लिटर पाणी मिळणार असून थोडयाच दिवसांत पैठण टॅंकरमुक्त होईल. घरोघरी पाणी, सर्व शेतीस रस्ते देण्यासोबतच पैठण तालुक्यात ५०० एकरावर फळ व अन्नप्रक्रीया उद्योग उभारणार असून यातुन बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

पैठणीचे हरवलेले गतवैमव प्राप्त करून देण्यासाठी रेशीम उद्योगाला चालना देण्यात येईल. प्रसिद्ध पैठण येथील उद्यानाला जागतिक दर्जाचे उद्यान बनविणार असुन सर्वानी मिळालेल्या मंत्रीपदाचा फायदा करून घ्यावा. आपण पक्षभेद विसरून सर्व विकासकामे करणार असुन ज्याचे ताब्यात ग्रामपंचायत, सोसायटी नाही असे लोक विरोध करताहेत त्यांना जनता जागा दाखवून देईल. पैठण येथे सत्र न्यायालय सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी नऊ कोटी रुपये मंजूर केल्याचे मंत्री भुमरे यांनी सांगितले. यावेळी अखिल भारतीय मराठी साहीत्य संमेलनात कथाकार म्हणुन निमंत्रित राजेंद्र गहाळ याचा मंत्री भुमरे यांनी सत्कार केला तर राम एरंडे ,विनोद मोटकर,नंदु काळे, भिमराव डोंगरे,आप्पासाहेब पाटील, राजेंद्र गहाळ यांनी मनोगत मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजुनाना भुमरे, जिल्हा परिषद सदस्य विलास भुमरे, सरपंच शिवराज भुमरे, कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापक दिपक शिंदे, योगिराज सुर्वे, सहाय्यक निबंधक अनिल पुरी, कृषीभुषण आप्पासाहेब पाटील, भिमराव डोंगरे, उपसरपंच शिवाजी भालसिंगे, जयकुमार बाकलीवाल, भागवत नरवडे, सरपंच भाऊसाहेब गोजरे, नितीन वाघ, दिनकर मापारी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button