ढोरकीन येथे तिन वेगवेगळ्या घटनेत नऊ जण जखमी
अधिक माहिती अशी की, पैठण औरंगाबाद मुख्य रस्त्यावर ढोरकीन नजीक असलेल्या देवगिरी हुरडा पार्टी समोर एक उसाने भरलेले ट्रेलर पंक्चर झाल्याने ते रस्त्यावर बंद अवस्थेत उभे होते. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास औरंगाबादहून पैठणच्या दिशेने जात असलेल्या कारने सदर ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात कारचालक सागर ईधाटे हे जखमी झाले. सदर ट्रेलर हे रस्त्यावर उभे असल्यामुळे अंधारात हे ट्रेलर जवळ येईपर्यंत दिसत नसल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे. अपघातानंतर रस्त्यावर असलेल्या कारला बाजुला सारवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. त्यानंतर सकाळी पाच वाजेदरम्यान फुलंब्रीहून प्रवासी घेऊन पैठणला जात असलेल्या क्रुझर जीपनेही त्याच ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या घटनेत क्रुझरमधील एकाच कुटुंबातील सात महीला व एक पुरुष गंभीर जखमी झाले. भाऊसाहेब सांगळे, सुरेखा सांगळे, मंगल सांगळे, संगीता सांगळे, भाग्यश्री सांगळे, रंजना सांगळे, पुष्पा सांगळे, चंद्रकला सांगळे असे जखमींची नावे आहेत.
त्यांना तात्काळ १०८ रुग्णवाहिकेतून औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर तिसऱ्या घटनेत ढोरकीन गावात असलेल्या एका पुलाच्या कठड्यावर ट्रक चढली. परंतु सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. बाजुलाच नागरी वस्ती होती. परंतु सदर ट्रक कठड्यावर चढून तिथेच अडकून बंद पडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. सदर घटना हि अरुंद पुलामुळे घडली. या परीसरात असलेल्या अरुंद पुलामुळे असे छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटना कायम असतात. मात्र तरीही संबंधित विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांतून संताप व्यक्त केला जात आहे.