औरंगाबाद

जिल्ह्यातील प्रलंबित पशुवैद्यकीय चिकित्सालयाची कामे तातडीने सुरू करा


◾राष्ट्रवादीच्या अनिता वानखेडे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनातून मागणी

विलास लाटे/ पैठण : पैठण तालुक्यासह जिल्हाभरात प्रत्येक तालुक्यात पशुवैद्यकीय चिकित्सालय बांधण्याच्या कामाला तीन वर्षांपूर्वी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र अद्याप  कामे पूर्ण झालेली नाही. यामुळे पशुपालकांची गैरसोय होत आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या अनिता वानखेडे यांनी पुढाकार घेऊन शुक्रवार,१२ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संबंधित प्रलंबित कामे पूर्ण करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

    मागील तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील पुर्ण तालुक्यात पशुवैद्यकीय चिकित्सालय बांधकामांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून गेल्या तीन वर्षांपासून सदर कामे पूर्ण झालेली नाहीत. हि फार मोठी शोकांतिका आहे. एकीकडे शासन पशुधन संवर्धन व पालनासाठी पशुपालकांना विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून प्रोत्साहित करते. तर दुसरीकडे त्याच पशुधनांना पाहिजे त्या प्रमाणात वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याचे जाणवत आहे. त्यामुळे पशुपालकांतून चिंता व्यक्त केली जात आहे. एवढ्या महागा-मोलाची जनावरे सांभाळून जर वैद्यकीय सेवे अभावी जनावरे दगावली तर पशुपालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे आर्थिक गणित कोलमडून पशुपालक कर्जबाजारी होऊन मोठ्या अडचणीत सापडतो. या सर्व बाबींचा बारकाईने विचार करून प्रलंबित व अपुर्ण अवस्थेत असलेल्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे कामे तातडीने पूर्ण करण्याचे संबंधितांना आदेशित करून पशुपालकांची होत असलेली गैरसोय थांबवावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या अनिता वानखेडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button