अहमदनगर
धोरणे, संस्था व विपणनावर 21 दिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम संपन्न
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : बदलत्या हवामानाचा कृषि उत्पादनावर व अन्न सुरक्षेवर परिणाम होत आहे. एक टक्का तापमान वाढीमुळे पाच टक्क्यापर्यंत उत्पादनात घट होते. यासाठी सर्व विस्तार यंत्रणा, शास्त्रज्ञ, विद्यार्थी व शेतकरी हे हवामान अद्ययावत शेतीमध्ये साक्षर झाले पाहिजे. ग्रामिण भागातील तरुण वर्ग नोकरीच्या शोधात शहरी भागाकडे स्थलांतरीत होत आहे. शेतीमधील हे स्थलांतर थांबविण्यासाठी उत्पादनावर आधारीत विस्ताराऐवजी विपणनावर आधारीत विस्तारावर काम करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ग्रामिण भागातील स्थानीक उत्पादने हे स्थानिक बाजारपेठांना जोडणे गरजेचे आहे. स्थानीक कृषि उत्पादन आणि स्थानीक बाजारपेठेची साखळी मजबूत करणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त शेतकर्यांना कृषि मुल्यवर्धनावर अधिक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. कृषि विस्तार सक्षम करण्यासाठी सरकारी खाजगी भागिदारी अजून बळकट करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन हैद्राबाद येथील मॅनेज संस्थेचे महासंचालक डॉ. पी. चंद्र शेखरा यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील जागतिक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राच्या वतीने हवामान स्मार्ट शेतीसाठी धोरणे, संस्था व विपणन या विषयावर 21 दिवसांचे ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यासक्रमाच्या समारोप प्रसंगी हैद्राबाद येथील मॅनेज संस्थेचे महासंचालक डॉ. पी. चंद्र शेखरा प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी नवी दिल्ली येथील भा.कृ.अ.प.चे माजी उपमहासंचालक व महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे उपस्थित होते. यावेळी नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. व्ही.व्ही. सदामते, जयपूर येथील कृषि विपणन राष्ट्रीय संस्थेच्या सहाय्यक संचालीका डॉ. सुची माथुर, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता आणि कृषि विस्तार विभाग प्रमुख डॉ. मिलिंद अहिरे, कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख व कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार उपस्थित होते.
अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ. किरण कोकाटे म्हणाले की जागतीक संघटनेच्या सचिवांनी आवाहन केले आहे की पुन्हा एकदा चांगले जग घडवूया. हे चांगले जग घडविण्यासाठी आपल्याला शेती समृध्द करणे गरजेचे आहे. शेती समृध्द करण्यासाठी शेती विषयक सक्षम धोरणे राबविणे आणि विपणन व्यवस्था सक्षम करणे गरजेचे आहे. याचबरोबर अन्नसुरक्षेसाठी सर्वांचे आरोग्य यामध्ये मृदा, वनस्पती, पशुपक्षी आणि मानवाचे एकात्मिक आरोग्य ही संकल्पना राबविणे गरजेचे आहे. हे प्रशिक्षण, शिक्षण तज्ञ, विस्तार कार्यकर्ते, शास्त्रज्ञ यांना पुढील धोरण ठरविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
डॉ. व्ही.व्ही. सदामते आणि डॉ. सुची माथुर यांनी या प्रशिक्षणासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. मिलिंद अहिरे यांनी कार्यक्रमाचे स्वागत केले, प्रमुख पाहुण्यांची ओळख करुन दिली आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी कास्ट-कासम प्रकल्पाची माहिती दिली व या प्रकल्पाद्वारे घेण्यात येणारे ऑनलाईन कार्यक्रम, प्रशिक्षणा संदर्भात माहिती दिली. याप्रसंगी प्रशिक्षणार्थी डॉ. स्वाती कोत्रा, डॉ. राजकिशोर भटनागर आणि डॉ. पंकजकुमार ओझा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत ऑनलाईन प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये 27 तज्ञांनी मार्गदर्शन केले. या 21 दिवसीय प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थींनी वैयक्तीक प्रकल्प आणि चमू प्रकल्प सादर केले होते. यामध्ये उकृष्ट प्रकल्पांना प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभांगी घाडगे आणि डॉ. सेवक ढेंगे यांनी केले. आणि आभार डॉ. संजय सपकाळ यांनी मानले.