अहमदनगर

सुखदेव सुकळे राज्यस्तरीय साहित्यसेवा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव विश्वनाथ सुकळे यांना ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचा राज्यस्तरीय साहित्यसेवा जीवन गौरव पुरस्कार साहित्य संमेलनात सौ. दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

श्रीरामपूरच्या नेवासा रोडवर असलेल्या इच्छामणी मंगल कार्यालयात दुसरे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रारंभीच प्रमुख पाहुण्या सौ. दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते सुखदेव सुकळे यांना बुके, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. संमेलन आयोजक अर्जुन राऊत व स्वागताध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सुखदेव सुकळे यांच्या सेवाभावी कार्याची माहिती दिली.

याप्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ. संदीप सांगळे, स्नेहग्रुप परिवारचे संस्थापक, अध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके, माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे, ह.भ.प. प्रा. डॉ. वसंत शेंडगे, ह.भ.प. दत्तात्रय बहिरट, संदीप पटारे, प्रा.डॉ.शरद दुधाट, कवयित्री संगीता फासाटे, प्रसन्न धुमाळ आदी उपस्थित होते. साहित्यिक सुखदेव सुकळे यांनी ३० जानेवारी २०१८ रोजी महात्मा गांधी पुण्यतिथीदिनी विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान स्थापन करून विविध सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक सेवाकार्य केले आहे. विविध पुरस्कारानी अनेकांना सन्मानीत केले.

गोरगरीब विद्यार्थीना पुस्तके, वह्या व आवश्यक वस्तूंचे वाटप ते करतात. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. ‘आमचे दैवत आणि आम्हीं’, ‘रावसाहेब शिंदे पत्रसंवाद पाच खंडात प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. ‘महादेव मळा: एक तीर्थक्षेत्र’, ‘समर्पित प्रकाशयात्री’, ‘देशहितवादी: कृषि सेनानी डॉ. अण्णासाहेब शिंदे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, शिक्षणतपस्वी ॲड. रावसाहेब शिंदे असे अनेक ग्रंथ लिहिले आहेत. सुखदेव सुकळे यांच्या कार्याचा अर्जुन राऊत यांनी यथोचित गौरव केल्याचा आनंद सौ. दुर्गाताई तांबे यांनी व्यक्त केला. सुखदेव सुकळे यांनी संमेलन आयोजक अर्जुन राऊत यांना विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे सन्मानचिन्ह, पुस्तके देऊन गौरविले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button