अहमदनगर

महेश मुनोत विद्यालयात बाबुशेठ मुथा यांना अभिवादन

राहुरी | जावेद शेख : तालुक्यातील वांबोरी येथील अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या महेश मुनोत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात थोर स्वातंत्र्यसैनिक, शिक्षण महर्षी मोहनलाल चुनीलाल उर्फ बाबूशेठ मुथा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना प्रशालेत अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या शाळा समितीचे जेष्ठ सदस्य प्रकाशलालजी मुथा होते. कै.बाबूशेठ मुथा यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाशलालजी मुथा, शाळा समितीचे को-चेअरमन हेमंत मुथा व मान्यवरांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक नागदे यांनी केले तर अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचा परिचय सचिन कराळे यांनी करून दिला. कै. बाबुशेठ मुथा यांचा जीवनपट बाळासाहेब नवले यांनी विषद केला.

यावेळी त्यांनी कै.बाबुशेठ मुथा यांनी वांबोरी येथे सरपंच असताना गावचा केलेला विकास, स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी भोगलेला तुरुंगवास, १९४२ मधील ‘चले जाव’ आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग तसेच शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेले अत्युच्च योगदान याविषयी सविस्तर व रोमांचकारी अशी माहिती दिली.

या पुण्यतिथीनिमित्त प्रसिद्ध व्याख्यात्या तथा राष्ट्रसेविका समिती नाशिकच्या बौद्धिक विभाग प्रमुख स्वाती रानडे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यांनी आपल्या व्याख्यानात माणसातला देव व देवत्वाचा अंश तसेच सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात कै. बाबुशेठ मुथा यांचे योगदान तसेच त्यांचे जीवन कार्य म्हणजे नवीन पिढीसाठी अभ्यासाचा एक खजिनाच आहे असे आपल्या मनोगतात सांगितले. आपल्या ओजस्वी व प्रभावी व्याख्यानाने विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले होते. विद्यार्थी जीवन व संस्कार, भारतीय संस्कृती व जगात भारतीयांच्या कीर्तीचा डंका तसेच परीक्षा व ताणतणाव याविषयी अतिशय रसाळ वाणीत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान व कौशल्य प्राप्त होण्यासाठी तसेच कमवा व शिका या योजनेचा मुख्य उद्देश सिद्ध करण्यासाठी त्याच प्रकारे देवाण-घेवाण म्हणजे काय? चलनांची ओळख, वजन व मापे यांचा परिचय व्हावा तसेच विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञान मिळावे या उद्देशाने विद्यालयात बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास सुरेश मुथा, राजू मुथा, संजय मुथा, गौरव मुथा, उदय मुथा, पोपट मुथा, प्रणित मुथा, प्रशालेचे प्राचार्य एस. एल. कुलकर्णी, उपप्राचार्य वनिता बोऱ्हाडे, पर्यवेक्षक संतोष काळापहाड, शिक्षकवृंद व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल कुलकर्णी यांनी केले तर आभार अनिकेत पाठक यांनी मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button