अहमदनगर

देवळाली प्रवरा शिवारात सातत्याने दर्शन देणारा बिबट्या अखेरीस जेरबंद

राहुरी | जावेद शेख : गेल्या महिन्यात लोणी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे नागरिकांत घबराट पसरलेली आहे. देवळाली प्रवरा भागात अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याने नागरिक भयभीत झाले असून येथील बंगला परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अखेरीस बिबट्या जेरबंद झाल्याने स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

सविस्तर वृत्त असे की, देवळाली बंगला परिसरातील डावखर वस्ती परिसरात असलेल्या धनराज कदम यांच्या शेतात वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी शुक्रवारी दुपारी लावलेल्या पिंजऱ्यात शनिवारी पहाटच्या सुमारास हा बिबट्या अडकला. सकाळी परिसरातील शेतकऱ्यांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली.

वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आर.एस.रायकर, वनरक्षक एस.एस.जाधव, एम.एन. गाडेकर, एस.एस.चव्हाण, एस.बी.खेमनर, वनरक्षक आर.आर.घुगे, वन कर्मचारी प्रदीप कोहकडे, महादेव शेळके, बाबासाहेब सिनारे, ताराचंद गायकवाड यांनी सदर बिबट्या मादी ताब्यात घेऊन बारागाव नांदूर रोपवाटिका येथे नेण्यात आलीय.

दरम्यान घटनास्थळी माजी आ.चंद्रशेखर कदम व माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी धाव घेऊन वन विभाग व अधिकारी यांच्याशी चर्चा करून ज्या ज्या भागात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे, त्या त्या ठिकाणी पिंजरे लावण्याबाबत सूचना केल्या. यावेळी वंचितचे तालुकाध्यक्ष संतोष चोळके, साईनाथ बर्डे, रवींद्र कदम, युवराज कदम, धनराज कदम, गणेश सिनारे, तुषार कदम, राजेंद्र सिनारे, रामप्रसाद कदम, राज मुसमाडे, बाळासाहेब कदम, सौरभ शिंदे, संदीप कदम, देवेंद्र कासार आदी उपस्थित होते.

देवळाली प्रवरा भागात अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याने नागरिक भयभीत झाले असून नागरिकांनी सायंकाळी ६ नंतर लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये, जनावरांसाठी बंदिस्त गोठे करावे, उजेडाच्या दृष्टीने घराजवळ लाईट व्यवस्था करावी, असे आवाहन वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button