शिक्षणवारी ज्ञान पंढरी

प्रा. राजेंद्र कांबळे हे समाजभान जपणारे आदर्श शिक्षक – प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’

राहुरी | जावेद शेख : मांढळ येथील राष्ट्रीय विद्यालय व क. महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र चंद्रभान कांबळे यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने हायवे डिलाईट फॅमिली रेस्टारंट, चिपडी ता. कुही, जि. नागपूर येथे सत्कार समारंभ, सस्नेह भोजन व संगीताच्या जायकेदार तडक्याचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सर्वप्रथम पुष्पाहार घालून अभिवादन करण्यात आले. पाहुण्यांच्या स्वागतानंतर माजी प्रा. राजेंद्र कांबळे व आयुष्यमती प्रतिभा कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. कांबळे यांनी श्री ॠख्खडाश्रम विद्यालय व क. महाविद्यालय, कुही येथे सामाजिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून २८ वर्षे सेवा दिली. यानंतर राष्ट्रीय विद्यालय व क. महाविद्यालय, मांढळ येथे २ वर्षे प्राचार्य पदावर कार्यरत राहिले. सेवानिवृत्ती निमित्ताने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

श्री ॠख्खडाश्रम विद्यालयाचे माजी प्रा. दिलीपसिंह बैस हे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी प्रा. कांबळे हे कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिकतेचे एक उदाहरण असून विद्यार्थ्यांचे लाडके असल्याचे गौरवोद्गार काढले. प्रमुख अतिथी व माजी शिक्षण उपसंचालक निलेश पाटील व ‘निळाई’चे प्रमुख प्रवीण कांबळे यांनी प्रा. कांबळे हे विद्यार्थीप्रिय व आदर्श शिक्षक असल्याचे संबोधले.

कवी, लेखक व समीक्षक प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’ यांनी आपल्या काव्यमय भाषाशैलीतून माजी प्राचार्य कांबळे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू विदीत केले. ते म्हणाले की, “सरांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व त्यांच्यातील गुणवत्ता वाढीसाठी अध्यापन, उपक्रम, यावर विशेष भर देऊन क्षमता, कौशल्य विकसित करण्यात योगदान दिले. त्यांच्या स्वप्नांना बळ दिले. कवी, वक्ता, भाष्यकार, समीक्षक म्हणून सरांचा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रात लौकिक असल्याने विद्यार्थ्यांच्या अंगी समाजभान रुजविण्याचे कार्य केले.”

राष्ट्रीय वि. व क. महाविद्यालयाचे प्रा. दिलीप वानखडे, श्री ॠख्खडाश्रम वि. व क. महाविद्यालयाचे माजी प्रा. रमेशचंद्र राठी यांची पण समयोचित भाषणे झालीत. नातलग, सहकारी, मित्रमंडळी व आप्तगण यांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू प्रदान करून प्रा. कांबळे यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय वि. व क. महाविद्यालय, नागपूरचे माजी प्राचार्य अनिल वासनिक यांनी प्रास्ताविक तर प्रा. सुरेश नखाते यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. अपेक्षा कांबळे हिने आभार मानले.

यानंतर संगीतकार फाल्गुनजी दिघाडे यांच्या नेतृत्वाखाली भीमगीत, भावगीत, भजन, गजल हा सांगीतिक कार्यक्रम घेण्यात आला. सुप्रसिद्ध गायक भीमराव तिरपुडे व विलास दिघाडे (कुरझडी, वर्धा), नागपूरातील व परिसरातील प्रतिभावंत गायक निलेश पाटील, अनिल वासनिक, शंकर पाटील, निखिल मेश्राम, जगदीश राऊत, निखिल कावळे, गौतम पाटील, चरणदास वैरागडे, रंगराज गोस्वामी, दिगांबर चनकापुरे, सम्यक कांबळे व इतर गायकांनी सुमधूर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. संवादिनी वादक फाल्गुनजी दिघाडे व तबला वादक नीरज दिघाडे यांनी हृदयस्पर्शी संगीताची साथ देऊन आनंदानुभूतीचा प्रत्यय आणला.

कार्यक्रमाला २३८ रसिक, श्रोतागण, आप्तेष्ट व समाजसेवी अशोक रामटेके, राहूल घरडे, विनय गजभिये, विनय पाटील, नरेश पाटील, विनोद मेश्राम, सिद्धार्थ मेश्राम, सुरेश वंजारी हे आवर्जुन उपस्थित होते. संगीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त प्रा. राजेंद्र कांबळे यांनी केले तर आभार प्रतिभा कांबळे यांनी मानले. शेवटी सुरुची भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button