कृषी

शेतीतील कष्ट कमी करण्यासाठी यांत्रिकीकरण करणे गरजेचे – कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील

राहुरी विद्यापीठ : विविध पीक पद्धतींचे अवलंबन ही शेतकऱ्यांची मागणी असून बदलत्या हवामानाच्या अनुषंगाने याबाबत विद्यापीठांमध्ये संशोधन सुरू आहे. येत्या काळात प्रत्येक क्षेत्रात यांत्रिकीकरणाची गरज असून कृषी क्षेत्रात पुढील पिढीला आकृष्ट करायचं असेल तर शेतीमधील कष्ट कमी करून यांत्रिकीकरणाचा अवलंब करण्याला पर्याय नाही असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल कमांडंट डॉ. पी. जी. पाटील यांनी केले.

कृषी महाविद्यालय, पुणे येथील डॉ. चिमा सभागृहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची 25 वी कृषी संशोधन परिषदेची बैठक पार पडली. या परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते तसेच राष्ट्रीय मृद विज्ञान व जमीन वापर नियोजन संस्थेचे संचालक डॉ. नितीन पाटील हे उपस्थित होते. विद्यापीठामध्ये वर्षभरात झालेल्या संशोधनाचे पुनरावलोकन करून मूल्यमापन करणे, संशोधनावर आधारित अधिकृत अहवाल, तंत्रज्ञानावर आधारित पत्रके, पुस्तके यांचे प्रकाशन करणे आणि संशोधनाची भविष्यकालीन दिशा ठरवणे या मुख्य उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी सदरील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की कृषी विद्यापीठातील कृषीविषयक आधुनिक संशोधनाबरोबरच स्थानिक पिकांचे वाण संवर्धन करणे, शुद्धता जोपासणे आवश्यक आहे. इथून पुढे गट शेतीवर भर द्यावा लागेल. त्याचबरोबर विविध औषधी गुणधर्म असलेली भरडधान्य आरोग्यासाठी महत्त्वाची असल्याने त्याखालील क्षेत्र वाढवून संशोधन करावे लागेल. विद्यापीठातील तंत्रज्ञान प्रभावीपणे प्रसारित करण्यासाठी विद्यापीठाने फुले कृषी वाहिनी 90.8 एफएम सुरू केली असून विविध मोबाईल ॲप्स विकसित केली आहेत असे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी डॉ. कैलास मोते मार्गदर्शन करताना म्हणाले की हवामानातील बदलांमुळे फळ पिकांवर मोठा परिणाम दिसून येत आहे. त्या अनुषंगाने संशोधनावर भर द्यावा लागेल. फळ पिकांची निर्यात वाढवण्यासाठी कीडमुक्त क्षेत्र घोषित करणे, रोग व कीडमुक्त रोपवाटिका विकसित करणे, निर्यातीचे मानक लक्षात घेऊन गुणवत्तापूर्ण कृषी उत्पादकता वाढवणे या बाबी निर्यात वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. त्याचबरोबर हायड्रोपोनिक्स व एरोपोनिक्स तंत्रज्ञानावर भर द्यावा लागेल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. नितीन पाटील आपल्या भाषणात म्हणाले की कृषी विद्यापीठे व भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या विविध संस्थांनी समन्वय साधून दोन्ही संस्थांकडे असलेल्या संकलित माहितीचे आदान -प्रदान करून त्याचा वापर भविष्यातील संशोधनासाठी करणे अत्यावश्यक आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांनी सदर बैठकीचा अहवाल सादर केला.

यावेळी त्यांनी भविष्यातील संशोधनविषयक दिशा व धोरणे यामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज व्यक्त केली. या बैठकीमध्ये कृषी व कृषी अभियांत्रिकीच्या सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागातील संशोधनाची सद्यस्थिती, भविष्यातील दिशा व धोरणे याबाबत सादरीकरण केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे व सहयोगी अधिष्ठाता डॉ. पराग हळदणकर या तज्ञ सदस्यांनी मौलिक मार्गदर्शक सूचना केल्या.

याप्रसंगी नाशिक येथील मिलेट्स मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष महेश चोरीया, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, नियंत्रक सदाशिव पाटील तसेच विद्यापीठातील सर्व संलग्न महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, सहयोगी संशोधन संचालक व पीक विशेषज्ञ उपस्थित होते. सहयोगी संशोधन संचालक डॉ. रवींद्र बनसोड यांनी स्वागत केले व डॉ. राजेंद्र वाघ यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button