अहमदनगर

मागणी नोंदवूनही शेतीसाठी पाणी का नाही ? जिल्हाध्यक्ष औताडे यांचा जलसंपदा विभागाला सवाल

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : अहमदनगर पाटबंधारे विभागाकडून भंडारदरा धरणाच्या रब्बी आवर्तनासाठी नमुना नंबर 7 अर्ज भरून घेतले असून शेतकऱ्यांनी सदर अर्जावर आपली मागणी केली आहे. सदर अर्जाची मुदत 15 डिसेंबर असून ती संपलेली आहे. तरी याबाबत अर्ज भरलेले शेतकरी हे पाणी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.

वास्तविक कार्यकारी अभियंता अहमदनगर यांनी 15 डिसेंबरच्या मुदतीनंतर शेती आवर्तन सुरू करणे गरजेचे होते. परंतु तसे न करता श्रीरामपूर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा करिता पिण्याचे आवर्तन घेण्यात आले. सदर पिण्याच्या आवर्तनात श्रीरामपूरच्या वरील भागात पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. यावरून रब्बीचे आवर्तन कधी घेणार ? असाही प्रश्न निर्माण होत आहे.

खरीपानंतर गेल्या चार महिन्यापासून शेतीसाठी आवर्तन नसल्याने व ग्रामीण भागातील शेततळे व पिण्याचे पाण्याची तळी भरून न दिल्याने यावर्षी धरण कार्यक्षेत्रातील पाणी पातळी खूप खालावली आहे. नोव्हेंबर मध्ये झालेल्या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला असून सदर पावसावर केलेली चारा पिके, गहू, हरभरा आदि पिकांना आज रोजी पाण्याची गरज असूनही सदर पिकांना देण्यासाठी पाणी नाही.

तरी दुष्काळी परिस्थितीमध्ये भंडारदरा धरणाचे तातडीने आवर्तन सुरू करणे गरजेचे आहे. जायकवाडीस पाणी सोडले, त्यावेळीच जायकवाडीचे रब्बीचे आवर्तन घेतले गेले. तरीही जवळपास शेती सिंचनासाठी 11.5 टीएमसी पाणी असूनही पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहे. याबाबत उपकार्यकारी अभियंता यांना वारंवार फोनवर शेतकरी पाण्याची मागणी करत असून सदर शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत. परंतु कालवा सल्लागार समिती वरील धरण कार्यक्षेत्रातील आमदार यांचेकडून आवर्तन सोडण्यासाठी का दिरंगाई होत आहे. त्यामध्ये लोकप्रतिनिधी नेवासा, श्रीरामपूर, राहता, संगमनेर व अकोले यांचा समावेश असून याबाबत पालकमंत्र्याकडूनही शेतीसाठी आवर्तनाचे कुठलेही नियोजन होताना दिसत नाही.

तरी कार्यकारी अभियंता यांनी आपल्या स्तरावर शेतकऱ्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन रब्बीचे आवर्तन सुरू करावे. तसेच सिंचन हे टेल टू हेड करावे. अन्यथा कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसह अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल. अथवा नमुना नंबर सात अर्जानुसार वेळेत पाणी न दिल्यास पाटबंधारे विभागाकडून अर्ज भरलेल्या क्षेत्राची नुकसान भरपाई मागण्यात येईल. ही सर्व जबाबदारी पाटबंधारे विभागाची राहील असा इशारा अनिल औताडे यांनी कार्यकारी अभियंता अहमदनगर पाटबंधारे विभागाला देण्यात आलेल्या निवेदनात दिला आहे.

सदर निवेदनावर तालुकाध्यक्ष युवराज जगताप, डॉ दादासाहेब आदिक, डॉ विकास नवले, शेतकरी संघटनेचे जेस्ट मार्गदर्शक सुदामराव औताडे, बंडू पटारे, साहेबराव चोरमळ, भागचंद औताडे, बबन उघडे, शिवाजी ताके, शैलेश वमने, शरद पवार, दिलीप औताडे, विजय पटारे, मनोज औताडे, गोविंद औताडे आदींसह शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button