इपीएस 95 पेन्शनधारकांच्या देशव्यापी मेळाव्यास लवकरच यश – कमांडर अशोक राऊत
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : इपीएस 95 पेन्शन धारक वयोवृद्ध असताना आज देशातून पन्नास हजारांच्यावर महिला पुरुष यांनी एकजूट दाखवून जेष्ठ भारत श्रेष्ठ भारत दाखवून दिले. आपल्या लढ्याची विजयश्री लवकरच दिसेल असे राष्ट्रीय संघर्ष समिती राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांनी देशव्यापी पेन्शनर्स मेळाव्यात रामलीला मैदान नवी दिल्ली येथे प्रतिपादन केले.
त्यानंतर पेन्शनरांची भव्य रॅली काढण्यात आली व दि. 8 डिसेंबर पासून मी व सहकारी जंतर मंतर येथे आमरण उपोषण सुरु करून ‘करो या मरो’ हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. कर्मचारी निवृत्ती वेतन योजना 95 [EPS95] अंतर्गत 75 लाख निवृत्ती वेतनधारक म्हणजे खाजगी क्षेत्रातील, सरकारचे उपक्रम, सहकारी क्षेत्र, परिवहन महामंडळ, विद्युत मंडळ, विडी उद्योग, वस्त्र उद्योग, विश्वस्त संस्था, औद्योगिक वसाहतीतील उद्योग आणि माध्यम क्षेत्रे ज्यांचे पेन्शनसाठी दरमहा 417 रुपये, 541 रुपये, 1250 रुपये त्यांच्या संपूर्ण सेवा कालावधीत त्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेसाठी योगदान म्हणून जमा केले जाते, त्यांना कोणत्याही महागाई भत्त्याशिवाय दरमहा सरासरी केवळ 1170 रुपये पेन्शन मिळते. यातील ४० टक्के लोकांना दरमहा एक हजाराहून कमी पेन्शन मिळत आहे. एवढ्या कमी पैशात वयोवृद्ध जोडप्याला सन्मानाची जीवन जगणे पूर्णपणे अशक्य आहे. किमान पेन्शनमध्ये 1000 रुपये वरून 7500 रुपये पर्यंत वाढ आणि DA, सर्व पेन्शनधारकांना कोणताही भेदभाव न करता उच्च निवृत्ती वेतनाची सुविधा, मोफत व दर्जेदार वैद्यकीय सुविधा आणि नॉन-ईपीएस 95 सेवानिवृत्त कर्मचार्यांना दरमहा 5000 रुपये पेन्शन इत्यादी मागणी EPS95 पेन्शनधारक सातत्याने करीत आहेत. सर्व प्रकारची आंदोलने करुन/ निर्णय प्रक्रियेतील सर्वांच्या भेटी गाठी घेऊन/ निवेदने देऊन सुध्दा केंद्र सरकार लक्ष देत नाही.
वरील मागण्या मान्य होण्यासाठी राष्ट्रीय संघर्ष समिती गेली 7 वर्षे संघर्ष करत आहे. संघटनेचे मुख्यालय असलेल्या बुलडाणा येथे 5 वर्षापासून साखळी उपोषण सुरु आहे. अत्यंत कमी पेन्शन आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव यामुळे दररोज 200 ते 300 EPS95 पेन्शनधारक हे जग सोडून जात आहेत. त्यामुळे पेन्शनधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे वरील मागण्या मान्य होण्यासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी दि. 7 डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर देशव्यापी निषेध मेळावा घेण्यात आला. त्यास लाखाचे वर देशातील पेन्शन धारक उपस्थित होते. यावर सरकारने त्वरित निर्णय घेतला नाही तर दिल्ली येथे जंतरमंतर वर 8 डिसेंबर ते 24 डिसेंबर पर्यंत आमरण उपोषण करणार आहेत अशी माहिती पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर यांनी दिली.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत, वीरेंद्र राजावत, पी एन पाटील, सुभाष पोखरकर, देवीसिंग जाधव तसेच देशातील विविध राज्यातील संघटना पदाधिकार्यांनी पेन्शनवाढ आदी प्रश्नाबाबत निवेदन करून निर्णय न झाल्याने निषेध केला. नगर पुणे, धुळे, नासिक व इतर ठिकाणांहून देशातील पेन्शनधारक दिवसभर उन्हात बसून उपस्थित होते.