कृषी

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील शेतकरी प्रथम प्रकल्प उत्कृष्ठ प्रकल्प म्हणुन सन्मानीत

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या भा.कृ.अ.प. शेतकरी प्रथम प्रकल्पास पालमपुर, हिमाचल प्रदेश येथे नुकत्याच झालेल्या वार्षिक राष्ट्रीय कार्यशाळेत उत्कृष्ठ प्रकल्प पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे कृषि विस्तार उपमहासंचालक डॉ. यु.एस. गौतम यांच्या हस्ते प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. रविंद्र निमसे यांनी पुरस्कार स्विकारला.

या प्रसंगी कृषि विस्तारचे सहाय्यक महासंचालक डॉ. आर.आर. बर्मन, पालनपूर येथील कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डि.के. वत्स, विस्तार शिक्षण संचालक डॉ. नवीन कुमार व नवी दिल्ली येथील कृषि विस्तारचे माजी उपमहासंचालक डॉ. किरण कोकाटे उपस्थित होते. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा शेतकरी प्रथम प्रकल्प देशात वीस राज्यातील 52 कृषि विद्यापीठे व भा.कृ.अ.प. केंद्रावर राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात देशभरातील 50 हजार शेतकरी सहभागी आहेत. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे गेल्या सहा वर्षापासून शेतकरी प्रथम प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे, कणगर, तांभेरे, कानडगाव या गावांची निवड करण्यात आलेली आहे.

या प्रकल्पाद्वारे निवडलेल्या गावांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार करुन एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेलद्वारे शेतीमध्ये शाश्वत उत्पादन वाढवून शेतकर्यांचे जीवनमान उंचविण्याचा उपक्रम यशस्वीरीत्या होत आहे. सन 2017-18 पासून 2928 पिक प्रात्यक्षिके, 34 शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम, 7 शेतकरी अभ्यास दौरे, 20 शेतकरी- शास्त्रज्ञ चर्चासत्र, 36 प्रक्षेत्र भेटी व 34 गट चर्चाद्वारे कृषि तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे प्रसार केला जात आहे.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या शेतकरी प्रथम प्रकल्पास उत्कृष्ठ केंद्र या पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, विस्तार शिक्षण संचालक, डॉ. सी. एस. पाटील, संचालक संशोधन डॉ. सुनिल गोरंटीवार व अधिष्ठाता (कृषि) डॉ. श्रीमंत रणपिसे यांनी प्रकल्प प्रमुख डॉ. पंडित खर्डे, सहसमन्वयक डॉ. सचिन सदाफळ, डॉ. भगवान देशमुख, डॉ. रविंद्र निमसे, वरिष्ठ संशोधन सहयोगी विजय शेडगे, प्रक्षेत्र सहाय्यक राहुल कोर्हाळे व किरण मगर यांचे अभिनंदन केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button