अहमदनगर

महात्मा फुलेंचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणणे गरजेचे – प्रसिध्द व्याख्याते प्रा.डॉ. मिलिंद कसबे

राहुरी विद्यापीठ : महात्मा ज्योतीबा फुले यांनी शेतकर्यांच्या व शेतीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पाणी व्यवस्थापनासारख्या विषयावर पुस्तकामधून विस्तृत असे लिखाण केले आहे. महात्मा फुलेंनी 150 वर्षापूर्वी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी जातीच्या पलीकडे जावून विचार केला. त्यांनी केवळ दलीतांचेच प्रश्न सोडवले नाही तर तत्कालीन समाजव्यवस्थेने उभे केलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे मोठे काम केले. आपल्या रोजच्या जगण्यात फुलेंच्या विचारांना कसे आणता येईल हे पाहायला हवे. त्यांच्या नांवाने नुसत्या घोषणा देवून काहीही होणार नाही तर प्रत्यक्ष कृतीत महात्मा फुलेंचे विचार आणणे अंत्यत गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रमुख पाहुणे व प्रसिध्द व्याख्याते प्रा.डॉ. मिलिंद कसबे यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे महात्मा ज्योतीबा फुले यांची 133 वी पुण्यतिथी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नानासाहेब पवार सभागृहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन प्रसिध्द व्याख्याते प्रा.डॉ. मिलिंद कसबे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील होते. याप्रसंगी आंतरविद्या शाखा जलसिंचन विभाग प्रमुख डॉ. महानंद माने, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक व विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महाविरसिंग चौहान, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष व उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. भगवान ढाकरे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलिक, वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आण्णासाहेब नवले, कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ शिंदे, जीवरसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अनिल काळे, उपकुलसचिव (विद्या) विजय पाटील, क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड व अधिदान व लेखा अधिकारी सुर्यकांत शेजवळ उपस्थित होते.

डॉ. मिलिंद कसबे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की महापुरुषांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्याची प्रक्रिया करणे म्हणजे त्यांच्या जयंत्या किंवा पुण्यतिथ्या साजरे करणे होय. महात्मा फुलेंनी शिक्षणाला महत्व दिले. त्यामुळे समाज शिक्षित झाला. महात्मा फुलेंच्या विचाराने समाज परिवर्तनाचे मोठे काम झाले. डॉ. महानंद माने आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की पूर्वी फक्त साक्षरता महत्वाची होती. परंतू आत्ताच्या काळात नुसती साक्षरता किंवा शिक्षीत असणे गरजेचे नाही तर मतीसुध्दा जागृत असणे तितकेच गरजेचे आहे. महात्मा फुलेंसारख्या महापुरुषांचे विचार आपण कृतीत आणले तर आपले जीवन सार्थक झाले असे म्हणावे लागेल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. महाविरसिंग चौहान यांनी करुन दिली. यावेळी कु. पल्लवी ठावूकर हिने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. विजू अमोलिक यांनी तर सूत्रसंचालन कु. कृतीका बुरांडे हिने केले. कार्यक्रमासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक तसेच पदव्युत्तर महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button