अहमदनगर

“वर्षश्राद्ध” आंदोलनाने रस्ता दुरुस्ती कृती समिती करणार प्रशासनाचा निषेध

राहुरी – येथील नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने राहुरीचे तहसीलदार चंद्रजीत राजपुत यांना नगर मनमाड रस्ता दुरुस्त करण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी प्रतिकात्मक “वर्षश्राद्ध” घालण्यात येणार असल्याबाबत निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी बोलतांना देवेंद्र लांबे म्हणाले की, अहमदनगर- कोपरगाव (NH 160) या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर सुरू व्हावे यासाठी ऑक्टोबर २०१९ पासून रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने वेळोवेळी अनेक आंदोलने करून प्रशासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मागील वर्षी ३ डिसेंबर २०२२ रोजी याच रोडवर अपघातात निधन पावलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली म्हणून तसेच प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी नगर मनमाड रोडवर सूतगिरण, जोगेश्वरी फाटा येथे दशक्रिया विधी घालण्यात आला होता.

३ डिसेंबर २०२३ रोजी या आंदोलनाला तब्बल १ वर्ष पूर्ण होत असून प्रशासनाकडून अजूनपर्यंत या रस्त्याच्या कामाला सुरुवात केलेली दिसत नाही. एकेरी वाहतूक, रस्त्यावर पडलेली खड्डे यामुळे दररोज अपघात होवून अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. मागील वर्षी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी ७ डिसेंबर २०२२ रोजी काम चालू करण्याचे पत्र देवून देखील काम करण्यात आलेले नाही. त्याच्या निषेधार्थ नगर मनमाड रस्त्यावर जोगेश्वरी फाट्याजवळ रविवार दि.३ डिसेंबर २०२३ रोजी प्रशासनाचे प्रतिकात्मक “वर्षश्राद्ध” घालून रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र लांबे पाटील यांनी दिली.

याप्रसंगी अशोक तनपुरे, प्रशांत खळेकर, राजेंद्र लबडे, अरुण निमसे, सतिश चोथे, जालिंदर अडसुरे, सचिन बोरुडे, अविनाश क्षीरसागर, राजेंद्र उंडे, अक्षय कोहकडे, ॲड.सुरेश तोडमल, ॲड.प्रकाश गागरे, भारत शेडगे, सचिन जाधव, किशोर गोसावी आदी उपस्थित होते. यावेळी कृती समितीचे सुनील विश्वासराव यांनी नगर मनमाड रस्त्यावर स्वतःचा व कुटुंबाचा जीव धोक्यात घालून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वर्षश्राद्ध आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button