दिव्यांगाकरिता स्वतंत्र कक्ष स्थापन करणार – सौ.सारिका कुंकलोळ
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : दत्तनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दिव्यांग व्यक्ती करिता सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात स्वतंत्र दिव्यांग सुविधा कक्ष स्थापन करण्यात येईल. दिव्यांगाकरिता विशेष घरकुल योजना राबविण्यासाठी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे यांच्या संकल्पनेनुसार प्रकल्प नियोजन करण्यात येईल. महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा संकल्प केला आहे त्याची पुर्तता तातडीने करण्यात येईल असे प्रतिपादन दत्तनगर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ.सारिका कुंकलोळ यांनी केले.
अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर व आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दत्तनगर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी सौ.सारिका कुंकलोळ, सदस्यपदी प्रेमचंदजी कुंकलोळ, सौ.नयना शेवाळे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे, सचिव वर्षा गायकवाड, आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुश्ताकभाई तांबोळी, उपाध्यक्ष सुनिल कानडे, जिल्हाध्यक्ष विश्वास काळे, दत्तनगर शाखेच्या अध्यक्षा सौ. विमल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड यांनी दिव्यांग व्यक्ती करिता संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, अंत्योदय योजना, स्वतंत्र रेशनकार्ड, 5% राखीव निधी, वैद्यकीय सुविधा इत्यादी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात स्वतंत्र दिव्यांग सुविधा कक्ष स्थापन करावा अशी मागणी केली. त्याचबरोबर दिव्यांग महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे या मागणीबरोबरच भावी कार्यकाळासाठी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुश्ताकभाई तांबोळी, सुत्रसंचलन संजय साळवे यांनी केले तर आभार सौ. अंजनाबाई रंधे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेंद्र दिवे, सौ.प्रमिला कानडे, सौ.संगिता वाघ, ढोणे, अंतोन धिवर, सुरेखा वाघ यांनी विशेष परिश्रम घेतले.