कृषी

तुरीचे सुधारीत वाण व तंत्रज्ञानामुळे डाळीच्या स्वयंपुर्णतेकडे वाटचाल – प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे

राहुरी विद्यापीठ : कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या तुरीच्या सुधारीत वाणांमुळे व तंत्रज्ञानामुळे तुरीचे उत्पन्न वाढून आपण डाळीमध्ये स्वयंपुर्ण होवू शकतो असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे यांनी केले.

कडगांव, ता. पाथर्डी येथील तूर उत्पादक शेतकर्यांच्या शेतावर कडधान्य सुधार प्रकल्पाच्या वतीने शिवारफेरी व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शेतकर्यांना डॉ. कुटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तूर किटकशास्त्रज्ञ डॉ. चांगदेव वायळ व रोगशास्त्रज्ञ डॉ. विश्वास चव्हाण उपस्थित होते. कृषि विद्यापीठांनी विकसीत केलेल्या तुरीच्या नवीन सुधारीत वाणांची व तंत्रज्ञानांची शेतकर्यांना माहिती व्हावी आणि या सुधारीत वाणांचा व तंत्रज्ञानाचा शेतकर्यांनी आपल्या शेतामध्ये प्रत्यक्ष अवलंब करुन भरघोस उत्पन्न घ्यावे म्हणून विद्यापीठाच्या वतीने यावर्षी राहुरी, पाथर्डी, नगर, संगमनेर, श्रीरामपूर, कर्जत, श्रीगोंदा व राहाता या तालुक्यातील 75 तूर उत्पादक शेतकर्यांच्या शेतावर आद्यरेखा प्रात्यक्षिके राबविण्यात आलेली असून शेतकर्यांना तुरीच्या लागवडीच्याच वेळी तुरीच्या सुधारीत वाणांचे बियाणे, हेलिओकिल, ट्रायकोडर्मा, रायझोेबियम, पी.एस.बी., कामगंध सापळे, हेलिल्यूर, तणनाशक व सुक्ष्म अन्नद्रव्य या निविष्ठांचे वितरण करण्यात आलेले आहे अशी माहिती डॉ. कुटे यांनी दिली.

याप्रसंगी डॉ. चांगदेव वायळ यांनी सांगितले की, तूरीवर 250 पेक्षा जास्त किडींचा प्रादुर्भाव होत असून आपण जर वेळीच या किडींचे नियंत्रण करु शकलो नाही तर, मात्र 30 ते 40 टक्यापेक्षा जास्त उत्पन्नात घट ही केवळ तुरीवरील किडींच्या प्रादुर्भावामुळे येत असते. त्यामुळे किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी आणि तुरीच्या चांगल्या उत्पन्न वाढीसाठी मात्र आपण तुरीच्या लागवडीनंतर 35 दिवसांनी 5 कामगंध सापळे व 50 पक्षीथांबे प्रति हेक्टरी लावावेत, पीक कळी अवस्थेत असतांना 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा 1500 पीपीएम अॅझाडिरेक्टीन 5 मिली/लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी, पिक 50 टक्के फुलोर्याच्या अवस्थेत असतांना हेलिओकिल (एचएएनपीव्ही) 250 एल.ई. 2 मिली/लिटर पाणी किंवा बॅसिलस थ्युरिनजेनेसीस 2 ग्रॅम/लिटर पाणी आणि यानंतर 15 दिवसांनी इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के प्रवाही 0.7 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के दाणेदार 0.4 ग्रॅम किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 टक्के प्रवाही 0.3 मिली/लिटर पाणी या प्रमाणे जर आपण सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा फवारणी केली तर मात्र किडींचे आपण प्रभावीपणे नियंत्रण करुन तुरीचे चांगले उत्पन्न घेवू शकतो.

यावेळी तुरीचे रोगशास्त्रज्ञ डॉ. विश्वास चव्हाण यांनी सांगितले की, तुरीवर 10 पेक्षा जास्त रोगांचा प्रादुर्भाव होत असून यापैकी वांझ रोग व मर रोग या दोन रोगांमुळेच तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. या रोगांच्या नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया करावी, पिकांची फेरपालट करावी तसेच तुरीचा खोडवा ठेवू नये. यावेळी कृषि सहाय्यक शारदा भापसे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करुन सूत्रसंचालन केले तर आभार प्रगतशील शेतकरी महादेव शिरसाठ यांनी केले. यावेळी कडगांव येथील प्रगतशील शेतकरी बाळकृष्ण गिते, भगवान सानप, नवनाथ गिते, राजेंद्र गिते, बाबासाहेब गिते व इतर शेतकरी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button