कृषी

बेनीन देशामध्ये कृषि यांत्रिकीकरणासाठी तांत्रिक सहकार्य करु – कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

राहुरी विद्यापीठ : बेनीन देशातील तरुण शेतीमध्ये काम करण्यास तयार नसल्यामुळे त्या देशात शेतमजुरांचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. यामुळे भविष्यात शेतीमधील सर्व कामे ही मशिनच्या सहाय्याने करावी लागणार आहेत. भारतामध्ये कृषि यांत्रिकीकरणात मोठे संशोधन झाले असून ट्रॅक्टर व ट्रॅक्टरच्या सहाय्याने करावयाच्या मशागतीच्या कामांमध्ये झालेल्या यांत्रिकीकरणात भारत जगात पुढे आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठातदेखील कृषि यांत्रिकीकरणात मोठे संशोधन झाले असून विद्यापीठाच्या माध्यमातून बेनीनमध्ये कृषि यांत्रिकीकरणासाठी तांत्रिक सहकार्य करु असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठात बेनीन या देशात कृषि यांत्रिकीकरणाच्या सहकार्यासाठी व कृषि यंत्राच्या चाचणी प्रमाणपत्राच्या कार्यवाहीसाठी दोन दिवसांच्या बैठकीचे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसंवाद सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार उपस्थित होते.

याप्रसंगी बनीन येथील कृषि, पशु व मत्स्य मंत्रालयातील अधिकारी व ग्रामीण अभियांत्रिकीचे तांत्रिक मार्गदर्शक म्हणुन काम करणारे डॉ. गॉनट्रॅन्ड बगान, राष्ट्रीय कृषि विद्यापीठातील संशोधन सहाय्यक श्रीमती आइना बोको, कृषि यांत्रिकीकरण राष्ट्रीस सोसायटीच्या प्रकल्प व्यवस्थापक श्रीमती मारी लिगन, बेनीन ग्रामीण अभियांत्रिकीच्या यांत्रिकीकरण सेवेचे प्रमुख लासीसी आदिबी, राष्ट्रीय कृषि संशोधन संस्थेचे संशोधन सहाय्यक हुगे झॅनाउ, कृषि यांत्रिकीकरणातील तांत्रिक मार्गदर्शक ज्युलस होडोनु, ऑसपीसेस डॅडजो व जी.आय.झेड. चे भारतातील समीर वालडीया, कृषि यंत्रे व शक्ती विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे व अ.भा.स. कृषि अवजारे व यंत्रे सुधार प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. तुळशीदास बास्टेवाड उपस्थित होते.

कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आपल्या भाषणात पुढे म्हणाले की महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये असलेल्या चाचणी केंद्रामध्ये विविध कंपन्यांनी तयार केलेले कृषि अवजारे, यंत्रे यांच्या चाचण्या घेतल्या जातात. कमी इंधन वापर, क्षमता, वापरातील उपयोगीता, सुरक्षीतता व डीझाईन या घटकांवर आधारीत चाचण्या होऊन या कृषि यंत्रांना प्रमाणपत्र दिले जाते. यानंतरच संबंधीत कंपन्यांना ही यंत्रे वा अवजारे विक्री करण्यास मुभा मिळते. विद्यापीठाच्या तांत्रिक सहकार्याने अशा प्रकारचे चाचणी केंद्रे बेनीनमध्ये उभारण्यासाठी मदत होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी कृषि अभियांत्रिकीमध्ये विद्यापीठाने केलेल्या कामाविषयीची माहिती दिली. डॉ. सी.एस. पाटील यांनी या बैठकीबाबतचा उद्देश विषद केला. डॉ. दिलीप पवार यांनी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कामकाजाविषयी माहिती दिली. डॉ. गॉनट्रॅन्ड बगान यांनी बेनीन येथील राष्ट्रीय कृषि विद्यापीठाच्या संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण विषयक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन नलावडे यांनी तर आभार डॉ. तुळशीदास बास्टेवाड यांनी मानले. या कार्यक्रमासाठी कृषि अभियांत्रिकी महाविद्यलयातील विभाग प्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते.

दोन दिवसांच्या या कार्यक्रमात कृषिमधील मशीनरी संदर्भातील संशोधन व विकास तसेच भारतातील चाचणी प्रमाणपत्रांची पध्दत याबाबतची माहिती या विषयावर डॉ. सचिन नलावडे, बेनीन येथील कृषि यांत्रिकीकरणातील विविध मुद्दे, मफुकृवि, राहुरी येथील कृषि यंत्रांची चाचणी पध्दत व सुविधा याबद्दल डॉ. तुळशीदास बास्टेवाड मार्गदर्शन करणार आहेत. सीड ड्रीलच्या चाचणी प्रोटोकॉल विषयीचे प्रात्यक्षिक डॉ. सी.एस. भांगरे व डॉ. आर.के. राठोड हे देणार आहेत. प्रक्षेत्र भेटीमध्ये सेंद्रिय व कास्ट प्रकल्प, उद्यानविद्या रोपवाटीका व प्रक्षेत्र, शेती अवजारे व मशीनरी प्रयोगशाळा, संग्रहालय, कास्ट प्रकल्पाची प्रयोगशाळा, राहुरी येथील श्री. कवाणे यांचे सुलभ इरिगेशन सेंटर व कोल्हार येथील श्री भणगे यांच्या कस्टम हायरींग सेंटरला भेट देण्यात येणार आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button